च्युईंगम पसरवत आहे प्रदूषण, तरूणांच्या आवडत्या या पदार्थाचा पृथ्वीला धोका
बबल गम पहिल्यांदा साल 1928 मध्ये बनविण्यात आला होता. सर्वात आधी वाल्टर डायमर यांनी एक गुलाबी रंगाचा पहीला बबल गम लॉंच केला होता.
नवी दिल्ली : तुम्ही कधी टाईमपाससाठी च्युईंगम चघळत त्याचा आस्वाद घेतला असेल. परंतू हे च्युईंगम वातावरणात नैसर्गिकरित्या विघटीत होत नसून ते पृथ्वीवर प्लास्टीक सारखे तसेच नष्ट न होता कायम स्वरुपी रहाते हे तुम्हाला कदाचित माहीती नसेल. त्यामुळे पुढच्यावेळी तुम्ही च्युईंगम चघळण्यापूर्वी या गोष्टीचा नक्की विचार कराल. त्यामुळे विविध फळांच्या चवीची च्युईंगम पर्यावरणासाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एक लाख टन च्युईंगमचा वापर
जगभरात दरवर्षी लोक सुमारे 1,00,000 टन च्युईंगम चघळतात. पूर्वीच्या काळात जेव्हा च्युईंगमचा शोध लागला नव्हता त्याकाळात चीकल नावाच्या फळाचा डींकासारखा पदार्थ चघळत असायचे. 1950 च्या दशकात याची जागा सिंथेटिक गमने घेतली. या गम बेस सोबत आधुनिक च्युईंगममध्ये वनस्पती तेल, इमल्सीफायर सारखे सॉफ्टनरचा वापर केला जातो. जे चिकटपणा कमी करतात. या च्युईंगमना वेगवेगळे फ्लेवर, गोडपणा, प्रिजर्वेटीव्स आणि रंग मिक्स केला जातो. सिथेंटिक गमचे विघटन होत नाही. काही प्रकरणात या गमला रिसायकल करीत त्याच्यापासून नविन प्लास्टीक उत्पादने बनविली जातात. आता विघटीत होणारा खास प्रकारचा च्युईंगम देखील बनविण्यात येत आहे.
पहिला च्युईंगम कधी बनविला…
बबल गम पहिल्यांदा साल 1928 मध्ये बनविण्यात आला होता. सर्वात आधी वाल्टर डायमर यांनी एक गुलाबी रंगाचा पहीला बबल गम लॉंच केला होता. हा बबलगम याआधीच्या चघळण्यात येणाऱ्या पदार्थांपेक्षा जास्त मुलायम आणि लवचिक होता. त्याच्या याच वैशिष्ट्यांमुळे लहान मुलांमध्ये तो खूपच लोकप्रिय झाला. लहानमुले याचा बबल्स ( फुगे ) तोंडाने फुगवून आनंदीत होऊ लागले. बबल गमने बाजारात प्रवेश करताच च्युईंगमच्या रूप, रंग आणि स्वादात आमुलाग्र बदल झाला. आता अनेक रंग, स्वाद आणि आकाराचे च्युईंगम बाजारात सहज मिळू लागले आहेत.
च्युईंगम फायदे – तोटे
च्युईंगम खाण्याचे काही फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. च्युईंगम केवळ चावण्याचा पदार्थ आहे. त्याला गिळायचे नसते. काही अभ्यासानूसार च्युईंगम खाल्ल्याने एकाग्रता आणि मेमरी वाढण्यास मदत होते. च्युईंगम खाल्याने मेंदूत रक्तसंचार वाढत असतो. मेंदूत जादा ऑक्सीजन पोहचतो. त्यामुळे असे काही फायदे होतात तसे तोटे ही होतात. सतत चावत आणि चघळत राहील्याने जबडा दुखू लागतो. शुगर फ्री च्युईंगम तुम्ही खात असला तरी दातांचे आरोग्य त्यामुळे बिघडू शकते.