आता ‘कॉर्बेव्हॅक्स’ची लस बुस्टर डोस म्हणून घेता येणार; डीसीजीआयकडून मान्यता
कॉर्बेव्हॅक्स या लसीला कोरोनाची बुस्टर लस म्हणून मान्यता देण्यात आली आहे. डीसीजीआयकडून बुस्टर डोस म्हणून या लसीच्या वापराला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
नवी दिल्ली : कोरोना (Corona) लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कॉर्बेव्हॅक्स (Corbevax) या लसीला कोरोनाची बुस्टर लस म्हणून मान्यता देण्यात आली आहे. बायोलॉजिकल ईच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) कॉर्बेव्हॅक्स या लसीला कोरोना लसीचा बुस्टर डोस म्हणू मान्यता दिली आहे. ‘डीसीजीआय’कडून मान्यता मिळाल्याने आता ज्या व्यक्तींनी कोरोनाची लस कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन या पैकी एका लसीचे दोनही डोस घेतले आहेत, आणि त्यांना दोन डोस घेऊन सहा महिने पूर्ण झाले आहेत अशी व्यक्ती आता आपत्कालीन परिस्थीतीत कॉर्बेव्हॅक्स लसीचा डोस बुस्टर डोस म्हणून घेऊ शकते. देशासह राज्यात कोरोनाचे संकट टळले आहे असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात सरकारकडून नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्यावर भर दिला जाऊ शकतो.
दरात कपात
दरम्यान गेल्या महिन्यातच बायोलॉजिकल ई या कंपनीने आपल्या कॉर्बेव्हॅक्स लसीच्या किमतीमध्ये मोठी कपात केली आहे. या लसीची मूळ किंमत 840 रुपये एवढी होती. खासगी लसीकरण केंद्रावर ही लस घेण्यासाठी 840 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता कंपनीने आपल्या लसीच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे ही लस आता स्वस्तात उपलब्ध होणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कॉर्बेव्हॅक्स या लसीला बुस्टर डोस म्हणून मान्यता दिली आहे. ज्या व्यक्तीने कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन या लसीपैकी एका लसीचे दोनही डोस घेतले आहेत. हे डोस घेऊन सहा महिने पूर्ण झाले आहेत. अशा कोणत्याही 18 वर्षांवरील व्यक्तीला कॉर्बेव्हॅक्स या लसीचा डोस बुस्टर डोस म्हणून घेता येणार आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
भारतासाठी चिंताजनक बाब म्हणजे कोरोना संकट टळले आहे, असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात एकूण 4,270 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तीन महिन्यात प्रथमच भारताता कोरोन रुग्णांनी चार हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या भारतात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 24,052 इतकी आहे. कोरोनााचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध हटवण्यात आले. निर्बंध हटवण्यात आल्याने सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली. परिणामी पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.