औरंगाबादः ओमिक्रॉन (Omicron) हा नवा विषाणू आणि कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) अशी दोन्ही संकटं घोंगावत असताना औरंगाबाद जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे. जिल्हा टास्कफोर्सने सोमवारी तातडीची बैठक घेऊन काही निर्णय घेतले. त्यानुसार, जिल्ग्यातील कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाला (Corona Positive) घरी उपचार घेता येणार नाहीत. शासकीय किंवा खासगी कोव्हिड सेंटरमध्येच त्यांना दाखल व्हावे लागेल अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच प्रत्येक खासगी रुग्णालयात RTPCR चाचणीची सोय करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
– शहरातील चौका-चौकात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड ठोठावण्यात येणार आहे.
– खासगी रुग्णालयात ओपीडीबरोबरच RTPCR तपासणी सक्तीची करावी
– कोव्हिड पॉझिटिव्ह अहवाल आल्यास अशा नागरिकांचे घरीच विलगीकरण करणे बंद करावे. त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
– लसीकरणाचे प्रमाण जास्तीत जास्त वाढवावे.
– विना मास्क वाहनधारक दिसल्यास संबंधित गाडीचा फोटो परिवहन विभागाकडे पाठवला जाील.
– अशा वाहनधारकाला परिवहन विभागामार्फत नोटीस दिली जाईल.
इंग्लंडहून औरंगाबादेत येणाऱ्या एका कुटुंबातील एक तरुणी मुंबईत ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळली. हे कुटुंब मूळचे औरंगाबादचे असल्याने कुटुंबातील वडील यानंतर मुंबईत क्वारंटाइन झाले आणि तरुणीची आई व बहीण औरंगाबादेत क्वारंटाइन झाले होते. मुंबईतील सात दिवस क्वारंटाइन कालावधीनंतर वडील औरंगाबादेत आले असता त्यांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना ओमिक्रॉनची बाधा आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्यांचे स्वॅब पुण्यातील जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील यंत्रणाही अलर्ट झाली असून या व्यक्तीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाबाधित व्यक्ती ओमिक्रॉनग्रस्त आहे की नाही, हे कळण्यासाठी औरंगाबाहून रुग्णाचे स्वॅब पुण्याला पाठवले जातात. तेथील जिनोम सिक्वेन्सिंग लॅबकडून अहवाल येण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागते. तामुळे अशा प्रयोगशाळेचा प्रस्ताव घाटी रुग्णालयाने तयार करून तो शासनास पाठवावा,असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
इतर बातम्या-