चीन, हाँगकाँगमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले; मनसुख मांडवियांच्या अध्यक्षतेखाली बैठक, आरोग्य प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना
जगात पुन्हा एकदा वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झाले असून, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी अलर्ट जारी केला आहे. तसेच सर्वच स्थरावर कोरोना नियमांचे काटेकोर पालन होईल याबाबत आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
नवी दिल्ली : झीरो कोविड पॉलिसीचे (Zero covid policy) पालन करून देखील शेवटी पुन्हा एकदा चीनला (China) कोरोनाने गाठले आहे. चीनमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असून, काही प्रातांत कोरोना रुग्ण एवढे वाढले आहेत की, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. चीनच्या अनेक प्रांतात कोरोनामुळे लॉकडाऊन (Lockdown) लावण्याची वेळ आली आहे. ओमिक्रॉनचा सबव्हेरिएंट असलेल्या BA.2 या कोरोना विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. चीन प्रमाणेच हॉंगकॉंग आणि सिंगापूरमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जगात पुन्हा एकदा वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झाले असून, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी अलर्ट जारी केला आहे. तसेच सर्वच स्थरावर कोरोना नियमांचे काटेकोर पालन होईल याबाबत आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिले आहे. देशातील कोव्हिड 19 परिस्थिती आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकित हे निर्देश देण्यात आले आहेत.
बैठकीला आरोग्य खात्यातील वरिष्ट अधिकाऱ्यांची उपस्थिती
जगात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. विशेष: चीन आणि हॉंगकॉंग सारख्या देशात ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेल्या BA.2 विषाणूने धुमाकूळ घातला आहे. चीन मधील अनेक प्रांतात लॉकडाऊन लावण्याची वेळ आलीये. या सर्व पार्श्वभूमीवर 27 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात यावी की नाही? याबाबत देखील बैठकीत चर्चा झाली. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला आरोग्य सचिवांसह सरकारचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार आणि वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. भारतामध्ये बुधवारी कोरोनाच्या 2,876 नव्या रुग्णांची नोंद झाली. देशातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांचा आकडा 32,811 वर पोहोचला आहे. भारतामध्ये सध्या कोरोनाची साथ अटोक्यात आहे, मात्र भविष्यात ती वाढू नये यासाठी काय प्रयत्न करायला हवेत यावर देखील या बैठकीत चर्चा झाली.
तज्ज्ञांचे मत काय?
चीनसोबतच यूरोप आणि हॉंगकॉंगमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतात देखील कोरोनाची तिसरी लाट येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर बोलताना कोविड टास्क फोर्सचे हेड डॉक्टर नरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे की, भारतात कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता फार कमी आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देशात जेव्हा कोरोनाची तिसरी लाट आली होती, तेव्हा अनेकांना ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेल्या BA.2 याच विषाणूची लागण झाली होती. याचाच अर्थ भारतातील नागरिकांमध्ये BA.2 विरोधात लढा देणारी प्रतिपींडे ऑलरेडी तयार झाली आहेत. त्यामुळे भारतात कोरोनाची आणखी एक नवी लाट येईल असे वाटत नाही.