रात्रीचं वातावरणातील वाढणारं तापमान बेतेल पुरुषांच्या जीवावर, जाणून घ्या कसे
‘बीएमजे ओपन’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनातून धक्कादायक बाब समोर आली आहे. रात्री होत असलेल्या तापमान वाढीमुळे पुरुषांच्या मृत्यूचा धोका वर्तविण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, सामान्य उष्णतेपेक्षा फक्त 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढल्यास हृदयाशी संबंधित आजारांमुळे पुरुषांच्या मृत्यूचा धोका सुमारे 4 टक्क्यांनी वाढतो.
नुकतेच ‘बीएमजे ओपन’मध्ये एक धक्कदायक संशोधन समोर आले आहे. त्यानुसार रात्रीच्या तापमानात होणारी वाढ ही पुरुषांच्या जीवावर बेतण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा वर गेला आहे. पुढील किमान तीन ते चार दिवस हे महाराष्ट्रभर तीव्र उन्हाचे सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर हा अभ्यास महत्वपूर्ण ठरत आहे. अभ्यासानुसार, रात्री सामान्य उष्णतेपेक्षा फक्त 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढल्याने हृदयाशी संबंधित आजारांमुळे (Heart disease) मृत्यूचा धोका सुमारे 4 टक्क्यांनी वाढतो. बीएमजे ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या या नवीन संशोधनानुसार रात्रीच्या तापमानात (temperature) वाढ झाल्याने मृत्यूचा धोका (Risk of death) फक्त पुरुषांमध्येच दिसून आला आहे. याचा महिलांवर कोणताही परिणाम होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
संशोधनात काय म्हटलंय
मागील अभ्यासानुसार, उष्ण हवामानामुळे मृत्यू आणि हृदयशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढते. मात्र यामध्ये कोणत्याही विशिष्ट वयोगटातील लोकांचा उल्लेख नव्हता. त्यामुळे टोरंटो विद्यापीठाच्या एका टीमने 60-69 वयोगटातील लोकांच्या मृत्यूचा अभ्यास केला. या अभ्यासासाठी, संशोधकांनी 2001 ते 2015 दरम्यान जून-जुलैमध्ये हृदयविकारामुळे झालेल्या मृत्यूंबाबत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून माहिती गोळा केली. तसेच किंग काउंटी, वॉशिंग्टन येथूनही असाच डेटा गोळा केला, जिथे हवामान जवळजवळ सारखेच आहे. 2001 ते 2015 दरम्यान, इंग्लंड आणि वेल्समध्ये एकूण 39,912 लोक हृदयविकाराने मरण पावले, तर किंग काउंटीमध्ये 488 लोक मरण पावल्याचे दिसून आले. संशोधकांना असे आढळून आले, की इंग्लंड आणि वेल्समधील तापमानात 1 अंश सेल्सिअस वाढ झाल्यास 60-64 वयोगटातील पुरुषांमध्ये हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका 3.1 ने वाढतो. त्याच वेळी, किंग काउंटीमध्ये तापमानात 1 अंश सेल्सिअस वाढ झाल्याने 65 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या पुरुषांमध्ये हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका 4.8 टक्के होता. संशोधकांनी इंग्लंड आणि वेल्ससारख्या देशांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, कारण अलीकडेच येथे रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे. संशोधकांचे म्हणणे आहे, की या आकडेवारीच्या आधारे, मध्य-अक्षांश ते उच्च-अक्षांश भागात राहणा-या लोकसंख्येच्या या संशोधनाच्या आधारावर तपासणी करणे आवश्यक आहे.
या लक्षणांवर लक्ष ठेवा
तापमान वाढीमुळे हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराच्या झटक्यासारखी लक्षणे आढळू शकतात. रात्री घाम येणे, छातीत दाटल्यासारखे वाटणे किंवा अस्वस्थता येणे ही लक्षणे हृदयविकाराची लक्षणे असू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका अहवालानुसार, इंग्लंडमध्ये दरवर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे सुमारे 80,000 लोक रुग्णालयात जातात. त्यामुळे त्याची लक्षणे कधीही दुर्लक्ष करू नका.
इतर बातम्या:
पाकिस्तानातील सत्तापेच कायम, राजीनामा देणार नाही, इमरान खान यांची ठाम भूमिका
केंद्रापाठोपाठ राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय