Fried food Disadvantages: लठ्ठपणा तर वाढतोच पण ‘या’ आजारांसाठीही कारणीभूत ठरतात तळलेले पदार्थ
जर तुम्हालाही तळलेले, चटकमटक पदार्थ खायची आवड असेल तर आजच यावर थोडा लगाम लावा. कारण या पदार्थांमुळे केवळ लठ्ठपणाच वाढत नाही तर आरोग्याच्या इतरही अनेक समस्या उद्भवतात.
नवी दिल्ली – समोसे असोत वा फ्रेंच फ्राईज (french fries) , चिकन असो किंवा भजी, तळलेले, चटकमटक चवीचे पदार्थ (eating fried food) खाण्यापासून स्वत:ला थांबवणे भल्याभल्यांना जमत नाही. जीभेचे चोचले पुरवणारे असे हे चविष्ट पदार्थ खाणं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं. पण हेच तळलेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी किती (fried food bad for health)हानिकारक असतात हे तुम्हाला माहीत आहे का ? तळलेल्या पदार्थांमुळे केवळ वजन आणि लठ्ठपणाच (obesity) वाढत नाही तर ते शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचेही काम करतात. ज्यामुळे आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या निर्माण होणे सुरू होते. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
तळलेले पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम :
1) सामान्य अन्नपदार्थांच्या तुलनेत तळलेल्या अन्नपदार्थांमध्ये खूप कॅलरीज असतात. तसेच त्यामध्ये फॅट्सचे प्रमाणही जास्त असते. जास्त कॅलरीज आणि फॅट्सचे सेवन केल्याने व्यक्तीच्या शरीरातील लठ्ठपणा तर वाढतोच पण आरोग्याचे इतर आजारही होतात.
2) तळलेल्या अन्न पदार्थांमध्ये अस्वास्थ्यकर ट्रान्स फॅट म्हणजेच अनहेल्दी ट्रान्स फॅट हे देखील जास्त प्रमाणात असते. ते आपल्या शरीरासाठील पचायला खूप कठीण असते. हे ट्रान्स फॅट शरीरासाठी अत्यंत हानिकारक असून त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
3) तळलेले अन्न पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन तर वाढतेच पण ते खाल्ल्याने हाय ब्लडप्रेशर (उच्च रक्तदाब) आणि हाय कोलेस्ट्रॉलची समस्याही उद्भवू शकते.
4) तळलेले अथवा भाजलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने टाईप-2 मधुमेह, लठ्ठपणासोबतच हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यताही वाढते.
5) तळलेल्या अन्नामध्ये ॲक्रिलामाइड नावाचा हानिकारक पदार्थ असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, असे अन्न सेवन केल्याने अनेक प्रकारचे कॅन्सर (कर्करोग) होण्याची शक्यता वाढते. म्हणून, आपल्या आरोग्याची काळजी घेतानाच, तळलेले अन्न पदार्थ खाणे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा.
6) दररोज तळलेले अन्न पदार्थ खाल्ल्याने कमी झोप येणे किंवा झोप न लागणे यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. पुरेशी झोप न झाल्यासल त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून येतो. यामुळे मूड बिघडणे, चिडचिड होणे, तसेच डोकेदुखी, थकवा आणि चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवतात. म्हणून तळलेल्या पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे.