वारंवार तहान लागणे ठरु शकते प्रकृतीसाठी घातक; काळजी घ्या, अन्यथा ‘या’ गंभीर आजारांना पडाल बळी!
तुम्हालाही जास्त तहान लागत असेल तर याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. या अवस्थेची सुरवातीलाच काळजी घेतली तर गंभीर स्वरूपाचे आजार होण्यापासून ते टाळता येऊ शकतात. जाणून घ्या, जास्त तहान लागणे हे कोणत्या आरोग्य समस्यांचे लक्षण मानले जाते.

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान 3-4 लिटर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर व आहारतज्ज्ञ (Dietitian) देतात. पाणी तहान शमवण्याव्यतिरिक्त, संपूर्ण शरीरात ऑक्सिजनची मात्रा सुधारण्यास मदत करते. अन्नाच्या पचनामध्येही ते महत्त्वाची भूमिका बजावते. पाणी हा लाळेचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो अन्न विलग करण्यास मदत करतो. मानवी शरीरातील कचरा बाहेर टाकण्यासाठी पाण्याची गरज असते. पण तुम्हाला माहीत आहे का की, खूप तहान लागणे (Very thirsty) देखील चांगले नाही, म्हणजेच तुम्ही भरपूर पाणी प्यायले तरीही तुम्हाला अनेकदा तहान लागते, तर हे एखाद्या आजारामुळे असण्याची शक्यता असते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्हालाही जास्त तहान लागत असेल तर याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. हे मधुमेहासारख्या आजाराचे (Diseases like diabetes ) लक्षण असू शकते. या अवस्थेची सुरवातीलाच काळजी घेतली तर गंभीर स्वरूपाचे आजार होण्यापासून ते टाळता येऊ शकतात. जाणून घ्या, वैद्यकीयशास्त्र जास्त तहान लागणे हे कोणत्या आरोग्य समस्यांचे लक्षण मानले जाते. ज्याबद्दल सर्वसामान्य लोकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
डिहाइड्रेशन किंवा निर्जलीकरण स्थिती
जर शरीर निर्जलीकरणाच्या अवस्थेत असेल, म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता असेल, तर तुम्हाला त्यात जास्त तहान जाणवू शकते. मात्र, ही समस्या प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात दिसून येते. उन्हाळ्याच्या हंगामात सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने शरीरातील बहुतेक पाणी घामाच्या रूपात बाहेर पडते, ज्यामुळे त्याची कमतरता होऊ शकते. काही परिस्थितीमध्ये निर्जलीकरण ही एक गंभीर समस्या देखील असू शकते, ज्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
गरोदरपणात लागते जास्त तहान
बहुतेक गर्भवती महिलांमध्ये वारंवार पाणी पिण्याची गरज भासणे ही एक सामान्य बाब आहे. तथापि, जर गर्भधारणेत अशी समस्या होत राहिली आणि ती वाढत गेली, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण ते गर्भधारणा मधुमेहाचे लक्षण देखील असू शकते. गर्भधारणेदरम्यान मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
मधुमेहाचे लक्षण
वारंवार तहान लागणे हे देखील तुमच्यामध्ये मधुमेह होण्याचे सूचक असू शकते. डॉक्टर म्हणतात की रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा शरीर लघवीद्वारे नैसर्गिकरित्या ते काढून टाकण्याचा प्रयत्न करते. वारंवार लघवी केल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते, त्यामुळे तहानही जास्त लागते. मधुमेह ही एक गंभीर आणि दीर्घकालीन समस्या आहे ज्याच्या प्रतिबंधासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
पॉलीडिप्सियाची समस्या
पॉलीडिप्सिया ही तीव्र तहान लागण्याची अवस्था आहे. पॉलीडिप्सिया बहुतेकदा लघवीच्या स्थितीशी संबंधित असते ज्यामुळे तुम्हाला खूप लघवी होते. वारंवार लघवी झाल्यामुळे, शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हाला जास्त तहान लागते. हे शारीरिक प्रक्रियेमुळे देखील होऊ शकते ज्यामध्ये आपण लक्षणीय प्रमाणात शरीरातील द्रव गमावतो.