मासिक पाळीत पोट दुखत होत म्हणून तिने पेनकिलर घेतली; तरुणीचा थेट मृत्यू
मासिक पाळीतील वेदना कमी होण्यासाठी म्हणून एका मुलीने स्वतःहून पेनकिलर घेतली आणि थेट तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एखादे औषधं घेणं किती जीवघेणं ठरू शकतं हे या घटनेवरून समजतं.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना काही दुखलं, किंवा लागलं की लगेच पेनकिलर घ्यायची.अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण डॉक्टरांकडे जाणे टाळतो. पण हे आपला जीव आपणच धोक्यात घालण्यासारखं आहे. मुख्यत: मासिक पाळी दरम्यान तर काही मुली हमखास असचं करतात. पोटात दुखत असेल किंवा अगंदुखी असेल तर लेगच पेनकिलर घ्यायची. पण यामुळेच एका मुलीला तिचा जीव गमवावा लागला.
काही मुलींना असह्य त्रास होतो. म्हणून शेवटी काहीजणींना पेनकिलर घेण्याची सवय असते पण तीच सवय जर जीवावर बेतली तर.. असंच घडलं एका मुलीसोबत. तिने वेदना सहन होईना म्हणून एक पेनकिलर खाल्ली पण तिचा थेट मृत्यू झाला.
पेनकिलर जीवावर बेतली
तामिळनाडूच्या त्रिची येथील पुलिवलम भागातून काही महिन्यांपूर्वी एक घटना समोर आली. जिथे एका मुलीने मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी एक गोळी खाल्ली त्यामुळे तिचा मृत्यू झाला. एका छोट्या गावात राहणाऱ्या 18 वर्षीय मुलीने मासिक पाळीदरम्यान पोटात तीव्र दुखत असल्याने पेनकिलरच्या गोळ्या घेतल्या, त्यानंतर मुलीची प्रकृती अचानक खालावली आणि त्यानंतर तिचा थेट मृत्यू झाला.
नेमकं पेनकिलर खाल्ल्यावर झालं काय?
मुलीला मासिक पाळी आली होती. तीव्र वेदना होत असल्याने तिने त्या वेदनेपासून आराम मिळावा यासाठी गोळी म्हणजेच पेनकिलर टॅबलेट घेतली होती. मात्र हेच औषध तिच्यासाठी घातक ठरलं. औषध घेतल्यानंतर काही वेळातच, मुलीला जास्त वेदना, उलट्या आणि चक्कर येऊ लागली, त्यानंतर तिचे पालक तिला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले, तेथे उपचार करून तिला घरी पाठवण्यात आले. घरी पोहोचताच मुलीची प्रकृती जास्तच बिघडली आणि ती बेशुद्ध झाली. यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला शासकीय रुग्णालयात नेलं ,तेथे तिला तातडीने उपचारासाठी दाखलही करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
डॉक्टरांचा सल्ला का आवश्यक?
या घटनेमुळे एक गोष्ट लक्षात आली की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही पेनकिलर घेणे किती घातक ठरू शकते ते. या मुलीने कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, कोणतीही तपासणी न करता पेनकिलर घेतली ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. आणि बऱ्याचदा आपणही असेच करतो. त्यामुळे किमान अशा घटनांमधून तरी सावध झालं पाहिजे जेणेकरून पुढे अजून कोणाच्या तरी जीवाला धोका निर्माण होऊ नये.
पेनकिलर किंवा कोणत्याही दुखण्यासाठी औषध घेत असाल तर किमान एकदा तरी ते डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. जी औषधे आपण खाणार आहोत ती आपल्याला सहन होणारी आहेत का? वैगरे असे अनेक गोष्टी समजतात. त्यामुळे जी औषधे आपण घेणार आहोत ती एकदा तरी डॉक्टरांकडून तपासून घेणे गरजेचे आहे.