Hair Care Tips: केस ओले ठेऊन झोपल्यास उद्भवू शकताता ‘या’ समस्या
बरेच लोक केस ओले असतानाच झोपतात. मात्र ही सवय तुमच्या केसांसाठी तसेच आरोग्यासाठीही नुकसानकारक ठरू शकते.
नवी दिल्ली – आपल्यापैकी अनेक लोक रात्री केस धुणं (hair wash) टाळतात. मात्र आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे सकाळी कामाच्या गडबडीत केस धुवायला वेळच मिळत नाही. याच कारणामुळे अनेक लोक संध्याकाळी किंवा रात्री केस धुतात. मात्र यामुळे केस लवकर नीट वाळत नाहीत व तसेच अर्धवट ओले केस (wet hair) घेऊन झोपावं लागतं. पण ओले केस घेऊन झोपण्याची ही सवय तुमच्या केसांसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही (bad for hair & health) नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी केस नीट वाळवून झोपले पाहिजे. अन्यथा त्रास सहन करावा लागू शकतो.
ओले केस ठेऊन झोपल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या
फंगल इन्फेक्शन – केस ओले ठेवून झोपल्यास टाळूवर बुरशीजन्य संसर्ग (इन्फेक्शन) होण्याचा धोका वाढतो. यामुळे त्वचारोग आणि कोंडा अशा समस्या उद्भवू शकतात. यीस्ट हे शरीराच्या ओलसर ठिकाणी सहजपणे वाढते. यामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोकाही वाढू शकतो.
केस तुटणे – रात्री झोपताना केस ओले राहिल्यास आपले केस कमकुवत होतात व त्यामुळे केस अधिक तुटतात. जेव्हा आपण केस घट्ट बांधतो किंवा केस ओलसर असतात तेव्हा ते खूप तुटतात. त्यामुळे निरोगी केसांसाठी केस ओले ठेवून झोपणे टाळावे. ते पूर्ण वाळवून मगच झोपावे.
थंडीचा त्रास – केस ओले असताना झोपल्यास केसांचे नुकसान तर होतेच शिवाय आपल्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. ओल्या केसांमध्ये झोपल्याने सर्दी होऊ शकते. एका अभ्यासानुसार, रात्री ओले केस घेऊन झोपल्याने शरीराचे तापमान कमी होऊ शकते. याचा आपल्या प्रतिकारशक्तीवर खूप वाईट परिणाम होतो.
अशी घ्या केसांची काळजी
कंडीशनर वापरा – संध्याकाळी किंवा रात्री केस धुणार असाल तर कंडीशनरचा वापर करावा. यामुळे आपले केस मुलायम राहतात. तसेच झोपताना केसांचा गुंताही होणार नाही. तुम्ही सकाळी केस सहज विंचरू शकाल.
सिल्कची उशी – रात्री झोपताना सिल्कच्या उशीचा वापर करावा. त्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होण्यापासून बचाव होईल. या उशीमुळे तुमचे केस तुटणार नाहीत. तसेच ते मऊसूत व मुलायम राहतील.
केसांची स्थिती – केस ओले ठेऊन झोपल्यास किती नुकसान होईल हे तुमच्या केसांच्या शैलीवरही बऱ्याच अंशी अवलंबून असतं. केस फार घट्ट न बांधता ते हलके बांधून झोपण्याचा प्रयत्न करा म्हणजे केस अडकणार नाहीत व खराब होणार नाहीत. अनेक वेळा केस ओले ठेवून झोपल्यास त्यांचा पोत बिघडतो.