Negative Effects Of Noise Pollution: ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आरोग्य धोक्यात, लोक बनत आहेत रागीट
आजकाल वातावरणात ध्वनी प्रदूषण खूप वाढले आहे, ज्यामुळे लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. आणि याचा परिणाम त्यांच्या स्वभावावरही होत आहे. गर्भवती महिलांसाठी ध्वनी प्रदूषण अतिशय धोकादायक ठरू शकते.
नवी दिल्ली – आजकाल वाढदिवस असो वा लग्न, लाऊड म्युझिक आणि डीजेशिवाय कोणतंही सेलिब्रेशन पूर्ण होत नाही. याशिवाय, जगातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक यामुळे वातावरणातील ध्वनी प्रदूषण (noise pollution) वाढतच चालले आहे. या ध्वनी प्रदूषणामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर (physical and mental health) परिणाम होतो. अनेक आरोग्य अहवालांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या धोकादायक दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामध्ये उच्च रक्तदाब (high blood pressure), झोप न लागणे, झोपेचे खराब शेड्युल, तणाव, चिंता आणि ऐकू कमी येणे या काही सामान्य समस्या आहेत.
मानसिक आरोग्यावर होतो नकारात्मक परिणाम
ध्वनी प्रदूषणाचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. एखाद्या व्यक्तीचा मेंदू मोठ्या आवाजाबाबत सदैव नेहमी अलर्ट किंवा सतर्क असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत ध्वनी प्रदूषणात दीर्घकाळ राहिल्याने चिंता आणि तणाव निर्माण होऊ शकतो. सतत ध्वनी प्रदूषणात राहणारे लोक तणावासाठी खूप संवेदनशील असतात. ध्वनी प्रदूषणामुळे लोकांमध्ये चिडचिड होणे, अस्वस्थ वाटणे, तणाव वाटणे, निराश होणे आणि राग येणे, अशा समस्या उद्भवू शकतात. तुमच्या आजूबाजूच्या उच्च आवाजावर नियंत्रण ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
झोपचे शेड्युल बिघडते
ध्वनी प्रदूषणाचा मनुष्याच्या झोपण्याच्या वेळापत्रकावर सर्वात जास्त परिणाम होतो. झोप न लागणे, मध्येच झोप मोडणे, झोप पूर्ण होण्यापूर्वी जागे होणे, असा त्रास होतो. खराब झोपेच्या वेळापत्रकामुळे एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. मात्र यामुळे तुमची एकाग्रता भंग होऊ शकते आणि मूड खराब होऊन तुमच्या समस्या वाढू शकतात.
शारीरिक आरोग्यावरही होतो परिणाम
ध्वनी प्रदूषणाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रकारे शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. मोठ्या आवाजामुळे काही वेळा गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, काही वेळेस त्या व्यक्तीच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. काही सामान्य परिस्थितींमध्ये ध्वनी प्रदूषणामुळे कानात सतत मोठा आवाज वाजत रहाणे आणि कान खराब होणे किंवा बहिरेपणा येऊ शकतो.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढतो
सतत ध्वनी प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्याने उच्च रक्तदाब, ब्लड विस्कोसिटी आणि कार्डिओव्हॅस्क्युलर रोगांचा धोका वाढू शकतो. मोठा आवाज आणि ध्वनी प्रदूषण हे मज्जासंस्थेसाठी धोकादायक असतात ज्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात. गरोदर महिलांसाठी ध्वनी प्रदूषण खूप धोकादायक ठरू शकते.