रोज सकाळी ब्रेकफास्ट करताना प्या भाज्या आणि फळांचा ज्यूस; रहाल फिट आणि हेल्दी !
रोज सकाळी ब्रेकफास्ट करताना तुम्ही अनेक तऱ्हेचे हेल्दी ज्यूस पिऊ शकता. वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे हे ज्यूस बनवणं खूप सोप असतं आणि ते आरोग्यासाठी फायदेशीरही ठरतं.
आजकालच्या धावपळीच्या काळात अनेक लोकांना सकाळी न्याहरी किंवा ब्रेकफास्ट (breakfast) करण्याचा वेळच मिळत नाही. मात्र हे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. अशा वेळी काही तुमच्या डाएटमध्ये काही हेल्दी ज्यूसचा (healthy juice) समावेश करता येऊ शकतो. वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे रस (vegetable and fruit juices) बनवणे खूप सोपे काम आहे, त्याला फारसा वेळही लागत नाही. आणि त्यांचे सेवन केल्याने शरीराला व आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. हे ज्यूस प्यायल्याने आपल्याला दिवसभर उत्साही वाटते. भाजी व फळांच्या ज्यूस मध्ये अनेक पोषक तत्वं, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. हे प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांपासून बचाव होतो.
बीटाचा ज्यूस –
बीटामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत मिळते. सकाळच्या वेळेस तुम्ही बीटाचा रस पिऊ शकत. यामध्ये अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. बीटामध्ये ॲंटी-ऑक्सीडेंट्स तसेच व्हिटॅमिनही भरपूर असतात. बीटाचा ज्यूस अवघ्या काही मिनिटांत तयार होतो व चविष्टही असतो.
डाळिंबाचा ज्यूस –
डाळिंब हे अतिशय हेल्दी आणि चविष्ट फळ आहे. तुम्ही सकाळचा नाश्ता करू शकत नसाल तर त्यावेळी डाळिंबाचा ज्यूस नक्की पिऊ शकता. तो प्यायल्याने तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल आणि उर्जाही मिळेल. डाळिंबाचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच ॲनिमियाच्या त्रासापासूनही बचाव होतो.
पालकाचा ज्यूस –
तुम्ही सकाळच्या वेळी पालकाचा ज्यूस पिऊ शकता. पालकामध्ये आयर्न (लोह) मुबलक प्रमाणात असते. तसेच इतरही अनेक पोषक तत्वे असतात. पालकाचा ज्यूस प्यायल्ययाने शरीराला अनेक फायदे मिळतात तसेच अनेक आजारांपासूनही बचाव होतो.
संत्र्याचा ज्यूस –
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए हे अतिशय मुबलक प्रमाणात असते. हा ज्यूस प्यायल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. आपली दृष्टीही सुधारते. सकाळी न्याहरीच्या वेळेस तुम्ही संत्र्याच्या रसाचे सेवन करू शकता.
बीट, सफरचंद आणि आल्याचा ज्यूस –
तुम्हाला जर दिवसभरासाठी उर्जा हवी असेल तर बीट, सफरचंद आणि आलं या तिघांचा ज्यूस प्यावा. आल्यामुळे या ज्यूसची चव आणखी वाढते. सकाळच्या वेळेस या ज्यूसचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते. हा ज्यूस प्यायल्याने आपल्याला दिवसभर उत्साह वाटतो.