Heart Attack: ‘या’ एका कारणामुळे भारतात येत आहेत सर्वाधिक हार्ट अटॅक, अशी घ्या काळजी
तरुण वयातच चालत फिरता हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भारतात वाढलेल्या या घटनांचे मुख्य कारण नेमके आहेतरी काय?
मुंबई, देशात दर दोन तासांना पाच जणांचा मृत्यू हा हृदय विकाराने होतो. कधी व्यायाम करताना तर कधी स्टेजवर परफॉम करताना तर कधी चालता फिरता हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याच्या घटना घडल्याचे आपण अनेकदा वाचतो. गेल्या 2 वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रिटींचा मृत्यू झाला आहे. मुख्य म्हणजे यांचे वय देखील जास्त नव्हते. लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका का येतो? आणि तो कसा टाळायचा? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. जाणून घेऊया यामागचे मुख्य कारण
वाढत्या हृदय विकाराचे मुख्य कारण
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका वाढला असून मधुमेह, उच्च रक्तदाब सारखे आजार घराघरात आहेत. या आजारांमुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो. पण गेल्या काही वर्षात भारतात हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने तज्ज्ञांनाही आश्चर्य वाटत आहे. यासाठी देशातील सुमारे 10 हजार हृदयरुग्णांचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासातून हृदयविकाराचे प्रमुख कारण समोर आले आहे.
रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे येतो हृदयविकाराचा झटका
देशातील 10,000 हृदयरुग्णांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, इस्केमिक हृदयरोग किंवा अरुंद रक्तवाहिन्यांमुळे होणारी समस्या हे भारतातील हृदयविकाराचे सर्वात मोठे कारण आहे. हृदयविकाराच्या 72 टक्के प्रकरणांमध्ये हे आढळून आले. जास्त धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह, वृद्धापकाळ किंवा वाल्वमध्ये कॅल्शियम साठा. या घटकांवर नियंत्रण ठेवल्यास हृदयविकाराचा धोका खूपच कमी होईल.
मधुमेह आहे प्रमुख कारण
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे हृदयविकारासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. अलीकडील अभ्यासात, त्यांना हृदयविकाराच्या प्रमुख कारणांपैकी एक मानले गेले आहे. मधुमेहामुळे 48.9 टक्के आणि उच्च रक्तदाब 42.3 टक्के लोकांची हृदयक्रिया बंद पडते. डॉक्टरांच्या मते हा निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहे. या दोन कारणांमुळे योग्य वेळी उपचार न मिळाल्याने आणि योग्य डॉक्टरांचा सल्ला न मिळाल्याने मृत्यूचा धोका लक्षणीय वाढतो.
या व्यतिरिक्त, अभ्यासामध्ये 18 टक्के हृदयविकाराचा झटका डायलेटेड कार्डिओमायोपॅथीमुळे आढळून आला. या आजारात हृदयाच्या कक्षांमध्ये (वेंट्रिकल्स) ताण येतो. 5.9 टक्के रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण संधिवातासंबंधी वाल्व्ह्युलर हृदयरोग असल्याचे आढळून आले. वाल्वुलर हृदयरोगाचा मुख्यतः तुमच्या हृदयातील वाल्ववर परिणाम होतो. 2.1 टक्के लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढवणारे इतर रोग आढळले.