Sleep: वयानुसार बदलते झोपेची वेळ, जाणून घ्या तुमच्यासाठी किती तास झोप गरजेची?
चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पुरेशी झोप मिळणे गरजेचे असते. झोप पूर्ण न झाल्यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पुरेशी झोप (sleep) मिळणे गरजेचे असते. लहान मुलांना तुम्ही बराच वेळ झोपताना पाहिलं असेल तर मोठ्या, वृद्ध व्यक्ती बराच काळ जाग्या असतात. आता हे असं का होतं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यामागे एक कारण आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, वेगवेगळ्या वयानुसार आपल्या शरीराला कमी किंवा जास्त झोपेची गरज असते. जर तुम्ही पुरेशी झोप घेत असाल तर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या (physically and mentally fit) तंदुरुस्त रहाल. गरजेपेक्षा कमी झोप घेणे तुमच्या आरोग्याचे (health problems) नुकसान करू शकते. मग झोपेचं योग्य गणित काय आहे ? आज याबद्दल माहिती जाणून घेऊया. हेही जाणून घेऊया की कोणत्या वयात किती तास झोपेची गरज असते.
जाणून घेऊया झोपेचे पूर्ण ‘गणित’ –
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, बरेचसे तज्ञ, मोठ्या व्यक्तींना रोज 7 तास झोप घेण्याचा सल्ला देतात. बऱ्याच वेळेस काही लोक यापेक्षा जास्त वेळ झोपतात तर काही लोकांना एवढी झोप घेणेही शक्य होत नाही. झोपेमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. तर लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी किती तास झोप घेणे गरजेचे, हेही जाणून घेऊया.
0-3 महिन्यांच्या मुलांसाठी 14 ते 17 तास झोप गरजेची असते. 4-12 महिन्यांच्या बालकांसाठी 12 ते 16 तास घेणे झोप आवश्यक आहे. 1 ते 2 वर्षे वयोगटातील मुलांना 11 ते 14 तास झोप गरजेची असते. 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना रोज 10 ते 13 तास झोप पुरेशी असते. 9 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांनी रोज 9 ते 12 तास झोपले पहिजे. 13 ते 18 वर्ष वयोगटातील तरूण मुलांनी 8 ते 10 तास झोप घेतली पाहिजे. 18 ते 60 वयोगटातील व्यक्तींसाठी रोज 7 तास झोप पुरेशी मानली जाते. 61 ते 64 वयातील व्यक्तींनी रोज 7 ते 9 तास झोपले पाहिजे 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या व्यक्तींनी रोज कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेती पाहिजे.




अपुऱ्या झोपेमुळे येऊ शकतात या समस्या –
काही लोकांची लाईफस्टाइल अशी असते की ते दिवसभरात अवघे काही तासच झोपू शकतात. मात्र असे करणे हे आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक असू शकते. कमी किंवा अपुरी झोप घेतल्यामुळे परत-परत आजारी पडण्याचा धोका वाढतो. पुरेशी झोप न घेतल्यामुळे मधुमेह, हायपरटेन्शन, जाडेपणा आणि डिप्रेशनसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळेच सर्व लोकांनी रोज पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.