Speech Therapy : मुलांना बोलण्यात येणारी अडचण स्पीच थेरपीने करा दूर; करा ‘ हे ‘ उपाय
बऱ्याच लहान मुलांना स्पष्ट बोलण्यात अडचण येते, त्यांचे उच्चार स्पष्टपणे होऊ शकत नाहीत. मात्र एखादे मूल बऱ्याच काळापर्यंत बोलू शकत नसेल तर स्पीच थेरपीची मदत घेऊ शकता. घरच्या घरी या थेरपीचा वापर करून ही समस्या दूर करता येऊ शकते.

Tips for Speech Therapy: बऱ्याच वेळा अनेक लहान मुलं छोटे-छोटे शब्द बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतात. लहानपणी बोलायला शिकणारी मुलं त्यांच्या बोबड्या आवाजात एक-दोन शब्द म्हणायला सुरूवात करतात, ते ऐकायला खूप गोड वाटतं. बरीच मुलं सुरुवातीस बोबडं किंवा तोतरं बोलतात. हळूहळू त्यांचे उच्चार आणि भाषा (Language and pronunciation) स्पष्ट व्हायला लागते. मात्र काही वेळेस काही मुलांना आपण सांगितलेली गोष्ट समजत नाही. आणि त्यांची भाषा व उच्चार स्पष्ट नसतात, तेव्हा समस्या (problem) निर्माण होऊ शकते. मुलांची भाषा आणि भाषेचे विकार यावर उपचार करण्यासाठी स्पीच थेरपीचा (speech therapy) वापर केला जातो. स्पीच थेरपी मुलांसाठी खूप फायदेशीर ठरते. या थेरपीच्या मदतीने मुलांच भाषा सुधारू शकते. जाणून घेऊया स्पीच थेरपी करण्याचे सोपे (tips) उपाय.
स्पीच थेरपीची गरज कधी ?
स्पीच थेरपीचा अवलंब नेमका कधी करावा, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. मॉम जंक्शनच्या मते , एखाद्या मुलाची भाषा स्पष्ट नसेल, तो काय सांगतोय हे समजून घेण्यात अडचण येत असेल. मुलांना शब्दांचा उच्चार नीट करता येत नसेल आणि स्वत:चं म्हणणं नीट मांडता येत नसेल. मुलं इतर मुलांमध्ये नीट मिसळू शकत नसतील, एकेकटी रहात असतील. वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षापर्यंत मुलं एखाद-दुसरा शब्दच शिकली असतील आणि त्यांचा उच्चार करता येत असेल, अशी लक्षणं मुलांमध्ये दिसत असतील तर त्यांच्यासाठी स्पीच थेरपीचा वापर करावा. स्पीच थेरपीमुळे मुलांच्या भाषेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. तसेच त्यांची विचार करण्याची क्षमताही वाढू शकते.
घरच्याघरी स्पीच थेरपी करण्याच्या टिप्स –
– मुलांना बोलण्यासाठी उद्युक्त करा, प्रोत्साहन द्या. जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा त्यांच्याशी जास्तीत जास्त संवाद साधण्याचा प्रयत्न करा.
– मुलं तुम्हाला जे सांगायचा प्रयत्न करत आहेत, त्याकडे नीट लक्ष द्या. त्यांना बोलायला जास्त वेळ लागला किंवा ते नीट बोलू शकले नाहीत, तरी त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्या आणि ते काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते ऐका.
– मुलं जर वाचू शकत असतील, तर त्यांना एखादे पुस्तक देऊन एकच वाक्य किंवा शब्द पुन्हा पुन्हा मोठ्याने म्हणायला सांगावे.
– जर मुलाला एखादा ठराविक शब्द म्हणण्यात किंवा त्याचा उच्चार करण्यात अडचण येत असेल , तर तो शब्द अर्धा-अर्धा तोडून त्याचा उच्चार करणे, तसेच तो वाचायला शिकवावे.