अशी ओळखा ‘मंकीपॉक्स’ची लक्षणे; उपचारांबाबत डब्लूएचओ काय सांगते?
मंकीपॉक्सचे रुग्ण जगभरात वाढत असल्याने, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगातील सर्व देशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच आजाराच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जावी असे देखील म्हटले आहे.
मंकीपॉक्सचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रॉयटर्सच्या अहवालानुसार (According to a Reuters report), जगभरातील 19 देशांमध्ये 237 प्रकरणे आढळून आली आहेत. डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन विभागाचे माजी प्रमुख डॉ. डेव्हिड हेमन म्हणतात की, लैंगिक संबंधातून मानवांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे त्याचा धोका समलैंगिकांमध्ये अधिक असतो. अशा स्थितीत मंकीपॉक्सवर (monkeypox) विशेष औषध नसताना उपचार कसे केले जात आहेत, त्यातून रुग्ण कसे बरे होत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संसर्ग झाल्यानंतर किती दिवसांनी मंकीपॉक्सची लक्षणे दिसतात, मंकीपॉक्स विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार कसे केले जात आहेत, कोणती औषधे दिली जात आहेत, कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे.
लक्षणे किती दिवसात दिसतात?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) म्हणते की मंकीपॉक्सची लक्षणे संसर्गानंतर 6 ते 13 दिवसांच्या आत दिसून येतात, परंतु कधीकधी त्यांना 5 ते 21 दिवस लागू शकतात. ताप, डोकेदुखी, थकवा आणि पाठदुखी यांसारखी लक्षणे संसर्गाच्या दिवसापासून पुढील 5 दिवसांत दिसून येतात. ताप आल्यानंतर 1 ते 3 दिवसात त्वचेवर त्याचा परिणाम दिसून येतो आणि पुरळ बाहेर येऊ लागते. 95 टक्के प्रकरणांमध्ये, चेहऱ्यावर पुरळ दिसून येते आणि 75 टक्के प्रकरणांमध्ये हाता पायांच्या तळव्यांवर पुरळ येते.
मंकीपॉक्सची लक्षणे किती काळ टिकतात?
मंकीपॉक्सची लक्षणे 2 ते 4 आठवड्यांपर्यंत दिसतात. यातील सर्वात गंभीर प्रकरणे लहान मुलांमध्ये आढळतात. विषाणूचा प्रभाव, रुग्णाच्या आरोग्यावर, संसर्गाचा परिणाम किती गंभीर असेल हे ठरवते. डब्ल्यूएचओ म्हणते की ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग गंभीर होतो. त्याची लक्षणे कांजण्या सारखी असतात.
आजारावरील उपचार
मंकीपॉक्सवर अद्याप कोणतेही विशिष्ट औषध सापडले नाही, मग जगभरातील केसेसवर उपचार कसे केले जात आहेत? यावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) म्हणते की, यावर अँटीव्हायरल औषधांचा उपचार केला जात आहे. मंकीपॉक्सच्या उपचारादरम्यान त्याची लक्षणे कमी करण्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जाते. मंकीपॉक्ससाठी कोणतेही विशिष्ट औषध नाही. त्याची लक्षणे चीकनपॉक्ससारखीच असतात. त्यामुळे त्याच्या उपचारात कांजण्यांचे औषध वापरले जाते. एक हे अँटीव्हायरल औषध आहे ज्याला टेकोविरिमेट देखील म्हणतात. ज्याला युरोपियन मेडिकल असोसिएशन (EMA) ने यावर्षी मान्यता दिली आहे. दरम्यान, ते जगभरात उपलब्ध नाही. त्याच वेळी, मंकीपॉक्सवर इतर देशांमध्ये इतर अँटीव्हायरल औषधांसह उपचार केले जात आहेत.
उपचारादरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
WHO नुसार रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. त्याला अजिबात उपाशी राहू देऊ नका. रुग्णाला पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही अशा प्रकारे आहार द्या. रुग्ण किती लवकर बरा होईल, हे त्याच्या रोगांशी लढण्याच्या क्षमतेवर म्हणजेच प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. त्याच वेळी, सामान्य निरोगी लोकांसाठी संरक्षण म्हणून, मानवांना प्राणी किंवा संक्रमित रूग्णांच्या संपर्कात न येण्याचा सल्ला दिला जातो.
मंकीपॉक्स संसर्ग कसा पसरतो?
मंकीपॉक्स संक्रमित व्यक्ती किंवा प्राणी यांच्या जवळच्या संपर्कातून किंवा विषाणूने दूषित सामग्रीद्वारे मानवांमध्ये पसरतो. हा रोग जखमा, शरीरातील द्रव, खोकला किंवा शिंकाचे थेंब आणि बिछानासारख्या दूषित सामग्रीद्वारे पसरतो. त्यामुळे सावध रहा आणि शरीरात काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नका.