सर्दी, खोकल्याने त्रस्त असाल तर स्वयंपाक घरातील मसाले ठरतील फायदेशीर
हिवाळ्यात सर्दी खोकला होणे अगदी सामान्य आहे.स्वयंपाक घरात ठेवलेले मसाले, चव आणि सुगंध वाढवण्यासोबतच औषधी गुणधर्मांनी देखील परिपूर्ण असतात. त्यामुळे ते आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी प्रभावी ठरतात.
नोव्हेंबर महिना सुरू झाला की थंडीची चाहूल लागते. अनेकांना हा ऋतू आवडतो. पण ह्या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. कारण हिवाळ्या पाठोपाठ अनेक आजार देखील येतात. जशी थंडी पडायला लागते तसे आपण उबदार कपडे घालायला लागतो. पण फक्त उबदार कपडे घालून काही उपयोग होत नाही तर शरीराला आतून उष्णता मिळणे गरजेचे असते. हिवाळ्यात शरीराला आतून उष्णता देणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. तरच या हिवाळ्यात आजारांपासून दूर राहता येईल.
हिवाळ्यात सर्दी, डोकेदुखी, ताप,घसा खवखवणे आणि खोकला या सर्वात सामान्य आरोग्य समस्या आहेत. त्यामुळे प्रत्येक किरकोळ आरोग्याच्या समस्येवर पुन्हा पुन्हा औषध घेणे योग्य नाही या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय देखील फायदेशीर आहेत. जे आपले आई,आजी पूर्वीपासून वापरत आहेत.आपण अशाच काही मसाल्यांविषयी जाणून घेणार आहोत जे हिवाळ्यात तुम्हाला सर्दी, खोकला, घसा खवखवणे यासारख्या समस्यांपासून आराम देऊ शकतात.
ओवा
सर्दी, खोकल्यावर ओवा गुणकारी आहे. लहान मुलांसाठी सर्दी, खोकला झाल्यावर ओवा खूप फायदेशीर ठरतो. यासाठी एका सुती कपड्यावरती ओवा टाकून त्याची एक पोटली तयार करून घ्या पोटलीला तव्यावर गरम करून त्याचा वास घेतल्यास सर्दी, खोकल्याला आराम मिळतो. यासोबतच एक कप पाण्यात एक चमचा ओवा आणि दोन तुळशीचे पाने टाकून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळा आणि ते मुलांना दिवसातून दोनदा एक चमचा द्या त्यामुळे देखील मुलांचा सर्दी, खोकला कमी होईल.
काळी मिरी
सर्दी, खोकल्यापासून आराम देण्यासाठी काळी मिरी अत्यंत फायदेशीर आहे. चहा मध्ये काळीमिरी टाकून तुम्ही पिऊ शकता याशिवाय तज्ञांचे म्हणणे आहे की हळदीचे दूध करताना त्यामध्ये देखील काळीमिरी टाकून पिल्याने त्याचे फायदे होतात . लहान मुलांना काळीमिरी अशी खायला आवडत नाही. त्यामुळे काळीमिरी पावडर थोड्या मधात मिसळून मुलांना देऊ शकता यामुळे कफही कमी होतो.
लवंग
घसा दुखत असेल तर काही वेळ लवंग तोंडात ठेवल्यामुळे घसा आणि खोकल्यापासूनही आराम मिळतो याशिवाय तुळशीची पाने आणि लवंग एकत्र खाल्ल्याने सर्दी खोकला चुटकीसरशी बरा होतो.
हळद
हिवाळ्यात लहान मुलांना आणि अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच हळदीचे दूध आवर्जून दिले जाते. हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जी हिवाळ्यात खूप गरजेची असते. आयुर्वेद तज्ञांच्या म्हणण्यानुसार हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच पण सर्दी आणि खोकल्यापासून बचाव होतो याशिवाय खोकला झाल्यास तव्यावर हळद हलकी गरम करून ती कोमट पाण्यासोबत रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो.