Cold and Cough: बदलत्या हवामानामुळे आजारी पडण्यापासून रोखतील ‘ हे ‘ पदार्थ
सर्दी -खोकल्यापासून वाचण्यासाठी किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
भारताच्या बहुतांश भागात सध्या हवामान (season) बदलू लागले आहे. लवकरच थंडीचे वातावरण सुरु होईल आणि अशा परिस्थितीत आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचे असते. थंडीमुळे बरेच जण नेहमी आजारी (fall sick) पडतात. वातावरणातील बदलामुळे केवळ लहान मुलेच नव्हे मोठ्या माणसांनाही सर्दी किंवा खोकला, तसेच अन्य आजारांचा सामना करावा लागतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी (low immunity) असेल तरी असा त्रास होऊ शकतो. सर्दी-खोकल्याचा त्रास टाळण्यासाठी किंवा कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही कोणत्या पदार्थांचे सेवन करू शकता, ते जाणून घेऊया.
लिंबू – हा एक असा पदार्थ आहे, ज्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आवश्यक घटक म्हणजेच व्हिटॅमिन सी हा योग्य प्रमाणात असतो. बदलत्या ऋतूत तुम्ही सकाळी लवकर गरम पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिऊ शकता. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच याचा फायदा त्वचेलाही होईल.
आवळा – रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किंवा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्त्वाचे असते. आवळा हे एक असे सुपरफूड आहे, जे व्हिटॅमिन सीने अतिशय समृद्ध आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो अतिशय स्वस्त व किफायतशीर असून , तुम्ही दररोज त्याचे सेवन करू शकता.
दालचिनी – ॲंटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असलेल्या दालचिनीचे आयुर्वेदात खास महत्व सांगण्यात आले आहे. ताप आला असेल किंवा त्यापासून वाचायचे असेल तर दालचिनीने बनलेल्या पदार्थांचे सेवन करावे. कोरोना काळात अनेक लोकांनी दालचिनीचा काढा पिऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवली. त्यामुळे रोजच्या आहारात दालचिनीचा समावेश जरूर करा.
अश्वगंधा – ही एक अशी औषधी वनस्पती मानली जाते, जी केवळ व्हायरल किंवा तापच दूर ठेवत नाही तर आपले मानसिक आरोग्य देखील निरोगी ठेवते. प्राचीन काळापासून सर्दी झाल्यास अश्वगंधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या बदलत्या ऋतूमध्ये अश्वगंधापासून बनवलेल्या गोष्टी तुम्ही नियमित खाल्ल्या तर त्याचा आरोग्याला फायदा होईल.