Health Tips: ‘ही’ लक्षणे दर्शवतात शरीरातील लोहाची कमतरता, ‘या’ 3 पदार्थांचा करा आहारात समावेश !
Health Tips: 'ही' लक्षणे दर्शवतात शरीरातील लोहाची कमतरता, 'या' 3 पदार्थांचा करा आहारात समावेश !
निरोगी आरोग्यासाठी आणि शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्व पोषक तत्वांची पूर्तता आपण करत आहोत का ? प्रत्येक व्यक्तीने स्वत:लाच हा प्रश्न विचारला पाहिजे, असे तज्ज्ञ सांगतात. शरीर स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक तत्वे, विटॅमिन्स आणि खनिजांची गरज असते. त्यात कमतरता आल्यास त्याचा शरीरावर अल्पकालीन (तात्पुरता) आणि दीर्घकालीन गंभीर (Health Problems) परिणाम होऊ शकतो. लोह (आयर्न) (Iron) हेही शरीरासाठी अत्यावश्यक खनिज असून ते, हिमोग्लोबिनच्या (Hemoglobin) निर्मितीसाठी महत्वपूर्ण असते. ज्याची बहुतांश भारतीयांमध्ये कमतरता असते. लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो. जेव्हा आपल्या शरीरात पुरेशा प्रमाणात लाल रक्तपेशी नसतात, तेव्हा हा त्रास होतो. लाल रक्तपेशी (Red Blood Cells) ऑक्सिजन समृद्ध असते, जे आपल्या फुप्फुसातून शोषले जाते. लाल रक्तपेशींमधून ऑक्सिजन शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचतो. शरीरातील प्रत्येक पेशीस पुरेसा ऑक्सिजन मिळणे गरजेचे असते. तो न मिळाल्यास आपल्याला थकल्यासारखे, कमकुवत वाटते आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
आहार तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आपण सर्वांनी ज्या पदार्थांमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर आहे, अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे. तसे न केल्यास शरीरात खनिजांची कमतरता जाणवू शकते. शरीरात लोहाची कमतरता असेल तर त्याचा परिणाम (शरीरातील) रक्ताच्या पातळीवर होतो, ज्यामुळे भविष्यात गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारतात, विशेषत: महिलांमध्ये, हिमोग्लोबिन कमी असल्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होते आणि त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात.
लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या
लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होण्याचा धोका सर्वाधिक असतो. पुरेशा लोहाअभावी, शरीरात लाल रक्तपेशींचे पुरेसे उत्पादन होत नाही. ज्यामुळे शरीरात सर्वत्र ऑक्सीजनचे वहन होत नाही. याचा परिणाम म्हणजे आपल्याला थकल्यासारखे वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो व वेळेनुसार, तो धोका वाढत जातो. त्याशिवाय लोहाच्या कमतरतेमुळे त्वचा पिवळी पडणे, चक्कर येणे, पायात झिणझिण्या आल्यासारखे वाटणे, जीभेवर सूज येणे अथवा वेदना होणे तसेच हात-पाय थंड पडल्यासारखे वाटणे, असे त्रास सहन करावे लागू शकतात.
लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, हे जाणून घेऊया.
पालक
पालकाचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते. पालकामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते, त्याशिवाय इतरही अनेक पोषक तत्वे असतात. ज्यामुळे शरीरातील जीवनसत्वे व खनिजांची कमतरता भरून निघते. मिळालेल्या माहिनीनुसार, 100 ग्रॅम कच्च्या पालकामध्ये 2.7 मिलिग्रॅम लोह असते, जे आपल्या शरीरातील लोहाच्या दैनंदिन आवश्यकतेपैकी 15 टक्के गरज पूर्ण करते. त्याशिवाय पालकामध्ये व्हिटॅमिन-सी मोठ्या प्रमाणात असते.
बीन्स आणि चणे
आहार तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, डाळी, छोले, मटार आणि सोयाबीन या पदार्थांचे सेवन करणेही शरीरासाठी चांगले असते. त्यांच्या माध्यमातून शरीराला आवश्यक आहे, तेवढ्या प्रमाणात लोह मिळते. विशेषत: शाकाहारी लोकांसाठी हा लोह मिळवण्याचा उत्तम स्त्रोत आहे. पांढरे व काळ्या वाटाण्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स तर मिळतातच, पण त्यातून पुरेशा प्रमाणात लोहही मिळते.
रेड मीट (लाल मांस)
लाल मांस हा आयर्नचा सर्वात उत्तम स्त्रोत आहे. लाल मांस हे प्रोटीन, कॉपर, सेलेनियम आणि व्हिटॅमिन-बी यांच्या पूर्ततेसाठी उत्तम मानले जाते. जे लोक मांसाहार करतात, त्यांच्यामध्ये लोहाची कमतरता असण्याची शक्यता कमी असते. मात्र लाल मांस अधिक प्रमाणात खाणे तब्येतीसाठी हानिकारक असते, ते ठराविक प्रमाणातच खावे.