Winter care: हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम पाणी वापरावे की थंड पाणी ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करावी की नाही हे बहुतांश लोक ठरवू शकत नाहीत. याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया.
नवी दिल्ली – उत्तर भारतात हिवाळा (winter season) सुरू झाला असून अनेक लोकांना हा ऋतू खूप आवडतो. एकीकडे लोक या ऋतूचा आनंद घेत आहेत, मात्र दुसरीकडे काही लोकांना सर्दी- खोकला अशा आजारांचा (cough and cold) सामनाही करावा लागत आहे. थंडीचा त्रास टाळण्यासाठी काही लोक गरम पाण्याने आंघोळ (hot water bath) करतात तसेच गरम पाणीही पितात. पण काही लोकांना मात्र थंडीच्या दिवसात आंघोळीसाठी गरम पाणी वापरावे की गार असा प्रश्न पडतो. थंडीच्या दिवसात थंड पाण्याने का गरम पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर आहे, याबद्दल बहुतेक लोक संभ्रमात असतात. तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल, तर याबाबत तज्ज्ञांचे काय मत आहे ते जाणून घेऊया.
तज्ज्ञ काय सांगतात ? उत्तर प्रदेशातील प्रेम रघू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अभिनव राज (MD) यांनी याबाबत माहिती दिली. हिवाळ्यात कोमट पाण्याने अंघोळ करणं हे फायदेशीर आहे, असे आयुर्वेदात सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि सर्दी व शरीर आखडण्याची समस्याही दूर होते. कोमट पाण्यामुळे शरीर चांगल्या रितीने स्वच्छ होते व तुम्हाला एकदम फ्रेश वाटते. आंघोळ करताना जास्त गरम पाणी वापरू नये, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. ज्या लोकांना त्वचेचा एखादा आजार आहे, त्यांनी गरम पाण्याचा वापर करणे टाळावे. अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करावा.
गार पाणी हानिकारक असते का ?
हिवाळ्यात थंड पाणी वापरणे हानिकारक नाही, असे आयुर्वेदात नमूद केल्याचे डॉ. अभिनव राज यांनी सांगितले. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत आहे आणि ज्यांना सर्दीचा त्रास नाही, ते थंड पाण्यानेही आंघोळ करू शकतात. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे व ज्यांना लवकर सर्दी होते, अशा लोकांनी थंड पाणी टाळावे.
थंडीत गरम पाणी प्यावे का ?
कोमट पाणी हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, असे आयुर्वेदात म्हटले आहे. कोमट पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात साठलेली चरबी बाहेर पडते आणि शरीर निरोगी राहते. कोमट पाणी पिणे हे प्रत्येक ऋतूमध्ये फायदेशीर असते. विशेषतः हिवाळ्यात कोमट पाणी आवर्जून प्यायले पाहिजे. हिवाळ्यात होणारे आजार टाळण्यासाठी दररोज व्यायाम करावा व चांगले अन्न सेवन करावे. या ऋतूमध्ये पचनसंस्था चांगली होते आणि जड अन्न सहज पचवता येऊ शकतं.
जेवणानंतर लगेच आंघोळ केल्याने होते नुकसान
प्रत्येक व्यक्तीने जेवणापूर्वी आंघोळ करावी, असे आयुर्वेदात म्हटले आहे. मात्र ते शक्य नसेल तर जेवणानंतर 2 तासांनी आंघोळ करावी. जेवणानंतर लगेच अंघोळ केल्यास पचनक्रिया बिघडू शकते आणि सांधेदुखीचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे जेवणानंतर लगेच आंघोळ करणे तसेच व्यायाम करणे टाळावे.