Honey in Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांनी मधाचे सेवन करणे योग्य की अयोग्य ? जाणून घ्या
मध हे खनिजे आणि ॲंटी- ऑक्सिडेंट्सने समृद्ध एक नैसर्गिक स्वीटनर आहे. ज्याचा योग्य वापर केल्यास ग्लाइसेमिक इंडेक्सवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
नवी दिल्ली: मधुमेह (Diabetes) म्हणजे शरीरातील ग्लुकोज अर्थात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे. आजकालची व्यस्त जीवनशैली (Bad Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे बहुतांश लोक हे मधुमेहामुळे ग्रस्त असतात. मधुमेहाच्या रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टर देतात. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स यासह साखरेचे म्हणजेच सर्व प्रकारच्या गोड पदार्थांचे प्रमाण नियंत्रित करणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत मधुमेहाचे अनेक रुग्ण आपल्या चहा किंवा कॉफीत मध मिसळून त्याचे सेवन करतात, पण मधुमेहात मधाचा (use of Honey) वापर करणे सुरक्षित आहे का? आरोग्य तज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, काही अटींचे पालन केल्यास मधुमेहामध्ये मधाचे सेवन करणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे. मधात असलेले ॲंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त ठरतात. त्याबद्दल जाणून घेऊया.
मधाचे पौष्टिक मूल्य
हेल्थलाइन डॉट कॉम नुसार, मधामध्ये ॲंटी-ऑक्सीडेंट्स यासह व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशिअम, फॉलेट आणि पोटॅशिअम यासारखे अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मधाचे सेवन केल्याने आरोग्याला मोठे फायदे मिळतात, तसेच कमजोर पेशींचे नुकसान होण्यापासूनही मदत होते.
मधुमेहात मधाचे सेवन
मध एक नैसर्गिक स्वीटनर आहे, परंतु तरीही मधात कॅलरीज, साखर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. पण साखर किंवा साखरेच्या इतर पर्यायांच्या तुलनेत मध रक्तातील साखरेच्या पातळीवर खूप कमी परिणाम करतो. (कदाचित) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, म्हणूनच डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना काही प्रमाणात वापरण्याची परवानगी देतात.
मधुमेहाच्या रुग्णांनी असे करावे मधाचे सेवन
मध हा पांढऱ्या साखरेपेक्षा गोड आहे हे लक्षात ठेवावे. त्यामुळेच त्याचा वापर कमी प्रमाणातच करावा.
जर आपल्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त वाढली असेल तर मधाचे सेवन करणे टाळावे.
मध खरेदी करताना त्याच्या शुद्धतेची काळजी घ्या. कारण आजकाल बाजारात साखरचे सिरप असलेला मध विकला जातो.
मधाचे सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
मधुमेहात मध सेवन करण्याचे फायदे
मधाचे सेवन केल्याने इन्सुलिनची पातळी वाढू शकते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते अथवा कमी करता येते.
मधाचे सेवन केल्याने त्यातील पोषक तत्वं आणि ॲंटी-ऑक्सीडेंट्स शरीराला मिळतात.
मधुमेहामुळे येणारी सूज कमी करण्यासाठी मध उपयुक्त ठरतो.
(टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)