‘या’ 7 पध्दतींनी वजन करा कमी, शरीराला होतील भरपूर फायदे
4 मार्च हा जागतिक लठ्ठपणा दिवस असतो. या दिवशी लोकांना लठ्ठपणा, त्यातून निर्माण होत असलेल्या गंभीर समस्या, लठ्ठपणा कमी करण्याच्या पद्धतींबद्दल जागरूक केले जाते. या लेखात वजन कमी करण्याचे नैसर्गिक मार्ग आपण पाहणार आहोत.
मुंबई : जागतिक लठ्ठपणा दिवसानिमित्त (World obesity day) दरवर्षी 4 मार्च रोजी जगभरात जनजागृती केली जात असते. Worldobesityday.org नुसार, जगभरात सुमारे 800 दशलक्ष लोक लठ्ठपणाचे बळी आहेत. (Due to obesity) लठ्ठपणामुळे अनेक आजार बळावत असल्याने लठ्ठपणाला एक व्याधी म्हणूनही त्याचे वर्गीकरण केले जात आहे. प्रत्येक 10 पैकी 5 लोक लठ्ठपणामुळे प्रभावित झाले आहेत. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करत आहेत. असे लोक इंटरनेटवर लठ्ठपणा कमी करण्याचे मार्ग, उपाय, व्यायाम, आहार इत्यादींचा शोध घेत आहेत. तुम्हालाही लठ्ठपणा कमी करण्याचा असेल तर या लेखात आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचे नैसर्गिक मार्ग (natural way) सांगणार आहोत, ज्यासाठी डायटिंग करण्याचीही गरज भासणार नाही.
काय आहे लठ्ठपणा?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार लठ्ठपणा ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरात असामान्य किंवा जास्त चरबी जमा होते, त्यामुळे शरीराला मोठा धोका असतो. लठ्ठपणा सामान्यतः ‘बीएमआय’द्वारे मोजला जातो, कारण यातून लठ्ठपणाचे आकडे अगदी अचूक मिळतात. 25.0 – 29.9 च्या बीएमआय श्रेणीमध्ये येणारे वजन जास्त आहेत, 30.0 आणि त्याहून अधिक श्रेणीतील लोक अत्यंत लठ्ठ मानले जातात. लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांना अनेक धोकादायक आजारांचा धोका असू शकतो. त्यात, मधुमेह, हृदयविकार, किडनी समस्या, काही प्रकारचे कर्करोग आदींचा समावेश आहे. लठ्ठपणा कमी केल्याने एकूण आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होते. लठ्ठपणा मानसिक आरोग्य, आनुवंशिकता, प्रक्रिया केलेले अन्न सेवन, बैठी जीवनशैली, तसेच झोपेच्या अभावामुळे होऊ शकतो.
या मार्गांचा अवलंब करा
1. सकस नाश्ता घ्या
वजन कमी करण्यासाठी नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या मते, जे लोक नाश्ता करत नाहीत ते दुपारचे जेवण एकदमच भरपेट करत असतात. त्यामुळे शरीरातील कॅलरीज खूप वाढतात. त्यामुळे सकाळी नाश्ता केला पाहिजे. नाश्त्यामध्ये ओट्स, फळे, अंडी, प्रोटीन शेक, ब्राऊन ब्रेड इत्यादींचा समावेश करावा.
2.पॅकेज ज्यूस टाळा
अनेकांना बाजारातील विविध शीतपेय किंवा पॅकेज केलेले ज्यूस प्यायला आवडते. या पेयांमध्ये कॅलरी आणि साखर खूप जास्त असते. म्हणून, वजन कमी करण्यासाठी, द्रव स्वरुपात किंवा पॅक केलेले कॅलरी असलेले कोल्ड्रींग्स्, पॅक ज्यूस, कॉफी हे टाळले पाहिजे.
3. फायबरयुक्त पदार्थ खा
फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे अशी फळे आणि भाज्या खा, ज्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळते. फायबरचे सेवन केल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही कमी खातात. फायबरचे प्रमाण वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे सेवन केले जाऊ शकते. फळांमध्ये नैसर्गिक साखर देखील असते, त्यामुळे कॅलरीज वाढू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच त्यांचे सेवन करा.
4. संपूर्ण धान्यांचा समावेश करा
तृणधान्ये खाल्ल्याने ऊर्जा टिकून राहते आणि त्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे नेहमी भरपूर संपूर्ण धान्य असलेले पदार्थ खावेत. यामध्ये तुम्ही ब्राऊन राइस, गव्हाचा पास्ता, होल व्हीट ब्रेड, गव्हाच्या कोंडापासून बनवलेली ब्रेड इत्यादींचे सेवन करू शकता.
5. पाणी प्या
वजन कमी करण्यासाठी पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. वास्तविक, पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि पोट भरल्यासारखे वाटते. काही अहवाल असे सूचित करतात की जेवणापूर्वी पाणी पिणे आपल्याला कमी अन्न खाण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते.
6. व्यायाम करावा
केवळ जिममध्ये जाउन वजन कमी होत नाही. कोणत्याही शारीरिक हालचालीमुळे वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी चालणे, धावणे, नृत्य करणे, सायकलिंग आदी व्यायाम प्रकारही उत्तम ठरतात. वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाली अत्यंत महत्वाच्या आहेत.
7. तळलेले पदार्थ टाळा
तळलेल्या अन्नामध्ये भरपूर तेल असते, ज्यामुळे शरीराला भरपूर कॅलरीज मिळतात. जर शरीराला अतिरिक्त कॅलरीज मिळाल्या तर ते शरीरात चरबी म्हणून साठले जाते. त्याचबरोबर तेलकट पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या समस्याही वाढतात.
संबंधित बातम्या :
चिंता नको… आता ‘या’ घरगुती उपायांनी काढा कपड्यांवरील डाग…
दक्षिण भारतातील ‘या’ सुंदर हिल स्टेशनला नक्की भेट द्या
शरीरात हे बदल दिसताच, तुम्ही वेळीच सावध व्हा; जीवघेण्या आजाराला पडू शकता बळी