तोल जातोय.. एक हात निष्क्रिय वाटतोय ? वेळीच सावध व्हा, ती या आजाराची तर लक्षणे नाहीत?
अचानकपणे काही लक्षणे जाणवली की त्याकडेही दुर्लक्ष होते परंतु हातातून वेळ निघाल्यावर उपचाराला झालेल्या विलंबामुळे त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागते. अशाच एका आजाराविषयी आपण जाणून घेणार आहोत. स्टोक (stroke)या आजाराबाबत टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत डॉ. पवन पै हे आजाराची कारणे, लक्षणे, उपचार पध्दती व खबरदारीचे उपाय याबाबत माहिती देत आहे.
ज्या प्रमाणे ह्रदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यावर ह्रदयविकाराचा झटका (heart attack) येण्याची शक्यता असते. त्याच प्रमाणे मेंदूला रक्तपुरवठा होण्यास अडचणी येत असल्यास किंबहुणा रक्तपुरवठा खंडित झाल्यास पक्षाघात म्हणजेच स्ट्रोक (stroke) होण्याची शक्यता निर्माण होते. डॉ. पवन पै यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाघाताची तीन प्रकारात विभागणी केली आहे.
पहिल्या प्रकारात हेमोर्जिक स्ट्रोकचा (hemorrhagic stroke)समावेश होता. मेंदुत अतिरक्तस्त्राव झाल्यास हा या प्रकारचा पक्षाघात होतो. दुसरा आहे इस्केमिक स्ट्रोक (ischemic stroke). रक्तपुरवठा कमी प्रमाणात झाल्याने हा या प्रकारचा पक्षाघात होत असतो. तर तीसरा आहे स्ट्रान्सीन्ट इस्केमिक अटॅक (transient ischemic attack) या प्रकारात रुग्णाला पक्षाघाताची काही लक्षणे जाणवू लागतात, यातून तो लवकर बरादेखील होउ शकतो.
पक्षाघाताची कारणे काय?
पक्षाघाताची प्रामुख्याने दोन कारणांमध्ये विभागणी केली जाते. यातील पहिल्या प्रकारात वैद्यकीय भाषेत इन कंट्रोल तर दुसर्या प्रकाराला रिस्क फक्टरमध्ये मोडले जात असते. डॉ. पवन पै यांच्या मते, पहिल्या प्रकारामध्ये उच्चरक्तदाब, मधुमेह, लिपीड कोलेस्ट्रोल, ओबेसिटी, जीवनशली, धुम्रपान, मद्यपान आदींचा समावेश होत असतो. या कारणांवर नियंत्रण मिळवून आपण पक्षाघाताला दूर करु शकतो. तर दुसर्या प्रकारात मात्र नियंत्रण होत नाही. त्यात, वय, अनुवांशिकता, लिंगगट, आदींचा समावेश होत असतो. म्हणूनच त्याला वैद्यकीय भाषेत रिस्क फक्टर म्हणून संबोधले जाते.
ही लक्षणे दिसल्यास सावध व्हा
पक्षाघाताच्या प्रमुख लक्षणांमध्ये, तोल जाणे, अचानक भुरकट दिसणे, एका बाजूचे तोंड वाकडे होणे, एक हात निष्क्रिय होणे, स्पष्ट बोलता न येणे आदींचा समावेश होत असतो. सांकेतिक भाषेत या लक्षणांचे वर्गीकरण हे बीफास्ट (BEFAST) असेही करता येते. B – Balance E – Eyes F – Face A – Arms S – Speech T – Time
तपासणी व उपचार पध्दती
पक्षाघाताची तपासणीसाठी सीटी स्कॅन, एमआरआय आदींच्या माध्यमातून नेमका कुठल्या प्रकारचा पक्षाघात आहे, याची माहिती होते. तसेच एमआर अँन्जोतही हा प्रकार लवकर समजून निदान होण्यास बरीच मदत मिळत असल्याचे डॉ. पवन पै सांगतात. उपचार पध्दतीचा विचार केल्यास पक्षाघात झाल्यापासून साडेचार तासांच्या आत रुग्ण योग्य वेळी रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला आयव्ही थ्रोम्बोलिसिस (iv thrombolysis) हे इंजेक्शन एक वरदान म्हणून ठरु शकते. याच सोबत रुग्णाला वेळेत आयव्ही टीपीए (IV TPA) व टेनेक्टाप्लेस (tenecteplase) ही इंजेक्शने दिल्यास रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. मेकेनिकल थ्रोम्बेक्टोमी (mechanical thrombectomy) या उपचार पध्दतीव्दारे रुग्णाची रक्तवाहिनीतील सर्व अडथळे उघडणे शक्य होत असल्याचेही डॉ. पवन पै यांनी सांगितले.
काय काळजी घ्याल
पहिल्यांदा ज्यांना पक्षाघात अद्याप झालेला नाही अशांनी रक्तदाब, मधुमेह हे नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यासोबतच दिवसाला किमान 30 मिनीटे व्यायाम करावा, चांगली झोप घ्यावी, सकस आहाराचा समावेश करावा. तर दुसरीकडे ज्यांना एक वेळा पक्षाघात होउन गेलाय त्यांच्यासाठी अँटी प्लेटलेस् महत्वाच्या आहेत. त्याने रक्त पातळ होण्यास मदत होत असते. याच बरोबर ह्रदयाची ठोके कमी पडत असलेल्यांसाठी अँटी कोगुलेशन ही गोळी वापरण्याचा सल्ला डॉ. पवन पै यांनी दिला आहे. पक्षाघात झाल्यानंतर रुग्णाला पुर्वपदावर येण्यासाठी साधरणत: 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. याकाळात फिजीओथेरपी करणे आवश्यक असते.
संबंधित बातम्या :
हिवाळ्यातील आरोग्य : बंद नाकाच्या समस्येबाबत अशी घ्या काळजी…
पिझ्झा, बर्गर खाताय तर सावधान; फास्ट फूडमुळे रोगप्रतिकारक शक्तीच शरीराला पोहोचवतीये हानी