Anhidrosis: घाम न येणे शरीरासाठी हानिकारक, जाणून घ्या कारण
बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते की त्यांनी कितीही मोठं किंवा कठोर परिश्रमाचं, दमवणारं काम केलं तरी त्यांना घाम येत नाही. हे ॲन्हीड्रॉसिस मुळे होऊ शकतं, जे आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतं.
नवी दिल्ली: थंडीचा ऋतू असो किंवा उन्हाळ्याचा, माणसाला घाम येणं (sweat) हे अत्यंत गरजेचे आहे. घामावाटे केवळ शरीरातील घाण बाहेर टाकली जात नाही, तर शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते. पण जर एखाद्या व्यक्तीला अजिबात घाम येत नसेल किंवा तो आला तरी तो फारच कमी येत असेल, तर काय होईल. घाम न येण्याबाबत तज्ज्ञांचे असे मत आहे की, हे फार धोकादायक आणि घातक (dangerous) ठरू शकतं. या अवस्थेला ॲन्हीड्रॉसिस (Anhidrosis) असं देखील म्हटले जाते. सामान्यत: जेव्हा एखाद्या व्यक्तीला अजिबात घाम येत नसेल तेव्हा ॲन्हीड्रॉसिसची अशी स्थिती उद्भवते. ज्या लोकांना व्यायाम आणि कठोर परिश्रम करूनही घाम येत नाही त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.
काय आहे कारण ?
क्लीव्हलँड क्लिनीक नुसार, ज्या लोकांना घाम येत नाही, त्यांच्या शरीराचे तापमान संतुलित नसते. ज्यामुळे खूप धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. घाम न येण्याच्या या समस्येमुळे मेंदूसह शरीराच्या अनेक भागांचे नुकसानही होऊ शकते.
अनेक कारणांनी होऊ शकतो ॲन्हीड्रॉसिस:
– अनेक औषधांमुळे घामाच्या ग्रंथी ब्लॉक होतात, ज्यामुळे घाम बाहेर येऊ शकत नाही.
– अनेक लोकांमध्ये जन्मत:च घामाच्या ग्रंथी नसतात.
– नसांना इजा झाली असेल तर अशा स्थितीत ॲन्हीड्रॉसिस होतो आणि घाम निघत नाही.
– त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येमुळे घाम न येण्याचा त्रास होऊ शकतो.
– शरीरात पाण्याची कमतरता असणे, हे देखील घाम न येण्याचे कारण असू शकते.
घाम न येणे का आहे धोकादायक?
– घाम न आल्याने मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
– घाम आला नाही तर उष्माघाताचा धोका वाढतो.
– घाम न आल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
– घाम आला नाही तर शरीरातील अनेक महत्वाचे अवयव काम करणे बंद होऊ शकते.
– बेशुद्ध पडणे किंवा चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते.
– कोणत्याही व्यक्तीसाठी घाम येणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा वेळी घाम येत नसेल, तर लगेचच एखाद्या डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घेण्याची गरज आहे.