Sleeping Disorder | घोरण्याची समस्या असू शकते ‘OSA’चे लक्षण, ‘या’ उपायांनी मिळेल आराम!
कधीकधी झोपेत घोरणे सामान्य आहे, परंतु जर दररोज आपल्याला हा त्रास होत असेल तर हे ‘ओएसए’चे लक्षण असू शकते.
मुंबई : आजकाल लहान मुलांपासून, तरूण आणि वृद्ध लोक, सर्वांनाच घोरण्याची समस्या आहे. कधीकधी झोपेत घोरणे सामान्य आहे, परंतु जर दररोज आपल्याला हा त्रास होत असेल तर हे ‘ओएसए’चे लक्षण असू शकते. ‘OSA’ अर्थात Obstructive Sleep Apnea हा झोपेशी संबंधित एक आजार आहे. ओएसए ही एक श्वसनासंबंधित समस्या आहे, ज्यात झोपेच्या वेळी आपला श्वास बर्याच वेळा थांबतो आणि आपल्याला जाग येताच परत सुरु होतो. आकडेवारीनुसार, भारतातील प्रत्येक पाचपैकी एक व्यक्ती ओएसए या समस्येशी झगडत आहे (Obstructive Sleep Apnea can cause Snoring problem).
‘चेस्ट’ सल्लागार आणि जयपूरच्या अस्थमा भवनचे कार्यकारी संचालिक डॉ. निष्ठा सिंह यांच्या मते, कधीकधी ओएसएमध्ये झोपेच्या वेळी श्वसनाच्या अडथळ्यामुळे रक्तात पुरेसे ऑक्सिजन मिसळत नाही, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या उद्भवू शकते. याशिवाय रात्री झोपेची कमतरता, चिडचिडेपणा, डोकेदुखी आणि तणाव यासारख्या त्रासांमुळे दिवसभर आळशीपणा वाढतो. म्हणूनच, जर आपल्याला दररोज घोरण्याची समस्या असेल, तर एकदा ‘स्लीप टेस्ट’ नक्की करून घ्या, जेणेकरून या समस्येवर वेळीच उपचार होऊ शकतील.
ही आहेत लक्षणे
घोरताना असा मोठा आवाज निर्माण होतो, जो इतरांच्या झोपेत देखील अडथळा आणतो. घोरण्याच्या दरम्यान श्वासोच्छ्वासाचा आवाज, अचानक थरथरणाऱ्या हालचालींमुळे झोपेतून जागे होणे, अस्वस्थ होऊन कूस बदलणे, मधून मधून जोराचे घोरणे, डोकेदुखी, तोंड कोरडे पडणे, चिडचिड होणे आणि स्मरणशक्ती कमी होणे अशा समस्या निर्माण होतात.
‘या’ लोकांना अधिक जोखीम
वृद्ध लोक, अधिक लठ्ठ लोक, रुंद किंवा लहान मानेचे लोक, ज्यांचे जबडे लहान आहेत अशा लोकांना ओएसएची शक्यता अधिक असते (Obstructive Sleep Apnea can cause Snoring problem).
स्लीप टेस्टद्वारे रोगाचे निदान
उपरोक्त लक्षणे दिसल्यास तज्ज्ञ स्लीप टेस्टची शिफारस करतात. ही चाचणी पॉली सोनोग्राफी मशीनद्वारे केली जाते. या चाचणीसाठी एक संपूर्ण रात्र आवश्यक आहे. चाचणी दरम्यान, रुग्णाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, छातीवर, पायांवर लीड लावली जाते आणि मेंदूचा ईईजी, हृदयाचा ईसीजी, स्नायूंचा ईएमजी, श्वासाचा वेग आणि घोरणे मोजले जाते. अहवालाद्वारे या आजाराचे निदान केले जाते.
‘हे’ उपाय येतील कामी
वजन कमी करा, हलका आहार घ्या, डाव्या बाजूला झोपायची सवय लावा. नियमित व्यायाम करा. जर आपण ओएसएचे रुग्ण असाल, तर झोपेच्या वेळी मागच्या बाजूला एक उशी ठेवा. सिपॅप मशीन वापरा आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे सेवन करा.
(Obstructive Sleep Apnea can cause Snoring problem)
हेही वाचा :
Sleeping Disorder | कमी झोपेमुळे ‘स्लीप एपनिया’चा धोका, जाणून घ्या लक्षणांबद्दल…https://t.co/FYlUQ1fYcu#SleepingDisorder #SleepApnea
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2020