Heart Attack : शरीराच्या ‘या’ भागांत होणाऱ्या वेदना म्हणजे हार्ट ॲटॅकचे संकेत !
शरीराच्या काही भागात वेदना होणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. ते संकेत कोणते हे वेळीच समजून घ्या.
सध्या आपण ज्या प्रकारच्या वातावणात, जशी जीवनशैली जगत आहोत, ते पाहता आपल्याला कोणता आजार (disease) किंवा त्रास सहन करावा लागू शकेल, हे सांगता येत नाही. मधुमेह, हाय ब्लड प्रेशर आणि कमी वयात येणारा हृदयविकाराचा झटका (heart attack), हे अतिशय कॉमन झाले आहे. हवामान, वाढते प्रदूषण आणि बिघडलेली जीवनशैली ही यामागील महत्त्वाची कारणे असू शकतात. शरीराच्या काही भागात वेदना (pain in body parts) होणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. ते संकेत कोणते हे वेळीच समजून घ्या.
लोकं अनेक प्रकारे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवतात. चुकीचे पदार्थ खाणे, पौष्टिक आहार न घेणे, वेळेवर न झोपणे, उशीरा उठणे, व्यायामाचा अभाव, अशी सध्याची बिघडलेली जीवनशैली आहे. त्यामुळेच एखादा रोग अथवा आजार अचानकही उद्भवू शकतो.
पचनक्रिया कमकुवत होणे
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पाचन क्रिया कमकुवत होऊ लागते. अशावेळी घाबरल्यासारखे वाटणे, पॅनिक होणे आणि गॅस तयार होण्यासारख्या समस्या उद्भवतात. यामुळे शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होऊ शकते. आणि त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते.
हा त्रास कायम राहिल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गॅसेसची समस्या दूर करण्यासाठी दररोज व्यायाम केला पाहिजे.
पाठीतील वेदना
जर तुम्हाला पाठीत दुखत असेल किंवा वेदना होत असतील, आणि हा त्रास वारंवार होत असेल तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षणदेखील असू शकते. पाठदुखीमुळे व्यक्तीच्या कामावरही परिणाम होतो. जर तुम्हाला बऱ्याच वेळेस पाठदुखीचा त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
छातीत दुखणे
हे हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. बऱ्याच वेळेस असे दिसून आले आहे की, छातीत दुखत असेल तर लोक त्याकडे गॅसेसमुळे होणाऱ्या वेदना समजून दुर्लक्ष करतात. मात्र ही चूक प्राणघातक ठरू शकते. छातीत दुखण्याव्यतिरिक्त, घाबरल्यासारखे आणि घाम येणे हेही हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असते.
या गोष्टींची घ्या काळजी
तुम्ही जर सिगरेट किंवा दारूचं सेवन जास्त करत असाल तर आजपासूनच ही सवय बदला. धूम्रपान व मद्यपान हे शरीरासाठी अतिशय धोकादायक असते. त्याशिवाय बाजारातील जंक फूडचे सेवनही कमी केले पाहिजे.
या प्रकारच्या अन्नपदार्थांमुळे धमन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. हृदयरोग टाळण्यासाठी निरोगी दिनचर्या पाळावी व नियमितपणे व्यायामही करावा.
(टीप – या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)