काय गं… गरोदरपणात तुला स्पॉटिंगची समस्या..? अशावेळी नेमकी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या!
अनेकदा गर्भधारणेच्या वेळी महिलांना स्पॉटिंगचा त्रास जाणवतो. अशा वेळी बहुतेक महिला याला रक्तस्त्राव समजून खूप घाबरुन जात असतात. परंतु स्पॉटिंग आणि ब्लीडिंग यात फरक असून तो समजून घेणे आवश्यक आहे.
गर्भधारणेमुळे महिलांची मासिक पाळी थांबत असते. तसेच गर्भधारणेत योनीतून रक्तस्त्राव होणे बाळासाठी जोखमीचे मानले जात असते. अशा स्थितीत एखाद्या स्त्रीला स्पॉटिंग (Spotting) झाल्यास ती घाबरून जाते. हे काही अनुचित घटनेचे लक्षण तर नाही ना? असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण होत असतो. पण तज्ज्ञांच्या मते, गरोदरपणात रक्ताचे हलके ठिपके दिसणे सामान्य आहे, परंतु जर रक्तस्त्राव (Bleeding) जास्त प्रमाणात होत असेल तर ते धोकादायक ठरू शकते. जर तुम्ही देखील गर्भधारणेच्या टप्प्यातून जात असाल, तर तुम्हाला स्पॉटिंगबद्दल व गर्भधारणेत (pregnancy) घ्यावयाची काळजीबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. सुरक्षित गर्भधारणेसाठी या गोष्टी माहिती करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे.
काय आहे स्पॉटिंग आणि ब्लीडिंगमधील फरक?
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा हलक्या गुलाबी किंवा तपकिरी रक्ताचा एखादा डाग दिसतो तसेच रक्तस्त्राव नसल्याने याला कुठल्याही प्रकारच्या पॅडची गरज पडत नाही तेव्हा त्याला स्पॉटिंग म्हटले जात असते. पण जर तुम्हाला पॅड लावण्याची गरज वाटत असेल किंवा अतिप्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर अशा परिस्थितीत, क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे आवश्यक ठरते.
स्पॉटिंग का होते?
गर्भधारणेदरम्यान स्पॉटिंगची अनेक कारणे असू शकतात, संभाव्य कारणे पुढील प्रमाणे :
- पहिल्या तिमाहीत सुमारे 20 ते 30 टक्के महिलांना स्पॉटिंग होण्याची शक्यता असते. म्हणूनच सामान्यतः ही चिंताजनक गोष्ट मानली जात नाही. परंतु पहिल्या तिमाहीनंतर स्पॉटिंग असल्यास, तज्ज्ञांना याबद्दलची माहिती दिली पाहिजे.
- गर्भधारणेदरम्यान, जोडीदारासोबत संबंध असतील तर तुम्हाला यामुळे स्पॉटिंग होऊ शकते. खरं तर,
- गर्भधारणेदरम्यान ग्रीवाच्या पॉलीप्सचा आकार वाढतो. अशा परिस्थितीत, शारीरिक संपर्कानंतर स्पॉटिंग होणे सामान्य आहे.
- जेव्हा फलित अंड गर्भाशयाच्या भिंतीवर आपली मुळे घट्ट करत असतो, तेव्हा स्पॉटिंगचे काही थेंब दिसतात. कोरिओन आणि प्लेसेंटामध्ये बदल झाल्यामुळे देखील स्पॉटिंग होऊ शकते.
दरम्यान, गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव ही धोक्याची घंटा मानली जाते. हे संक्रमण किंवा गर्भपाताचे लक्षण असू शकते. याशिवाय, प्रसूतीची तारीख जवळ आल्यावर गर्भाशय ग्रीवा पसरू लागते. या प्रकरणात, रक्तस्त्राव होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या समस्यांबद्दल आपण तज्ज्ञांना सांगणे आवश्यक आहे. स्पॉटिंग किंवा रक्तस्त्राव असला तरीही, कोणत्याही परिस्थितीत स्वत: डॉक्टर बनू नका. तज्ज्ञांना याची माहिती द्या व पुढील धोका टाळा.
संबंधित बातम्या :
मधुमेहाच्या रुग्णांना 45 टक्के किडनीचे आजार होण्याचा धोका, या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!
महिलांनो… या समस्येविषयी न लाजता बिनधास्त डाॅक्टरांना बोला, नाही तर समस्या अधिक गंभीर होऊ शकते!
Child care : लहान मुलांच्या तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी हे उपाय करा, तोंड नेहमी राहील निरोगी!