special report | World Diabetes Day 2021 | जाणून घ्या मधुमेह म्हणजे काय? याच दिवशी का साजरा केला जातो वर्ल्ड डायबिटीज डे
२१व्या शतकात कोरोनानंतर जगासाठी मधुमेह हा सर्वात भयानक आजार असेल. जागतिक मधुमेह दिनानिमित्त, आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ (IDF) आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या महितीनुसार जगभरात दरवर्षी सरासरी 4 लाख लोकांचा मधुमेहाने मृत्यू होतो.
मुंबई : आजकाल बहुतेक लोक हे मधुमेहाने ग्रस्त आहेत. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे तुम्ही काही नियम पाळले तर मधुमेहाची समस्या कमी होण्यास मदत होते. २१व्या शतकात कोरोनानंतर जगासाठी मधुमेह हा सर्वात भयानक आजार असेल. जागतिक मधुमेह दिनानिमित्त, आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ (IDF) आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या महितीनुसार जगभरात दरवर्षी सरासरी 4 लाख लोकांचा मधुमेहाने मृत्यू होतो. पण, 2021 मध्ये, महामारीच्या काळात 67 लाख मधुमेहींचा मृत्यू झाला आहे, या संख्येने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
हेल्थ कोच सर्टिफाइड डायबिटीस न्यूट्रिशनिस्ट डॉ. महेश पाटील यांच्या मते, “ज्या व्यक्तींचे वय 35 किंवा जास्त असून ती व्यक्ती अतिस्थूल असेल तर अशांनी वेळीच मधुमेहाच्या चाचण्या करणे गरजेचे असते. जर या चाचण्यांमध्ये तुम्ही मधुमेहाने ग्रस्त आहात असा निकाल आला तर आहारात योग्य ते बदल करुन या आजारावर मात करु शकतो. यासाठी जेवणामध्ये ब्राऊन राईस, ओट्स आणि ज्वारीचा समावेश करू शकतो तर आहारात ब्रेड, पांढरे तांदुळ, नूडल्स आणि प्रक्रिया केलेले अन्न पूर्णपणे टाळा असा सल्ला डॉक्टर देतात.
मधुमेह म्हणजे काय ?
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे किंवा असंतोलीत होणे म्हणजेच मधुमेह. हा आजार झालेल्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिन निर्माण होण्याची प्रतिक्रिया बंद होतो किंवा थांबते. शरीरात आवश्यक प्रमाणात इन्सुलिन प्रमाण निर्माण न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. आणि मधुमेहाची सुरुवात होते.
मधुमेहाचे प्रकार
टाइप 1 मधुमेह: हा आजार लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. रुग्णामध्ये इन्सुलिन फारच कमी किंवा तयार होत नाही. अशा रुग्णांना रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित ठेवण्यासाठी नियमित इन्सुलिनचा डोस द्यावा लागतो. टाइप-2 मधुमेह: एकूण रुग्णांपैकी 90% रुग्णांना याचा त्रास होतो. अशा रुग्णांमध्ये शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. तोंडावाटे औषधांसह इन्सुलिनच्या मदतीने ते नियंत्रित केले जाऊ शकते. व्यायाम खूप महत्वाचा आहे. गरोदरपणातील मधुमेह: गर्भधारणेदरम्यान रक्तातील ग्लुकोजच्या उच्च पातळीद्वारे दर्शविलेली स्थिती गर्भावस्थेतील मधुमेह आहे .
रक्तातील साखरेचे योग्य प्रमाण
रिक्त पोट: 100 mg/dL जेवणानंतर दोन तास: 140 mg/dL HbA1c: दर तीन महिन्यांनी 6.5%
मधुमेहाची कारणे
इंन्सुलिनचे असंतुलन आणि ड जिवनसत्वाचा परिणाम, कमी प्रमाणात व्यायाम करणे आणि अतिस्थूलता, उच्च रक्तदाब, खूप वेळ बसून राहणं, ताणतणाव, अनुवंशिकता ही मधुमेहाची कारणे असू शकतात.
मधुमेहाची लक्षणे
मधुमेहाच्या लक्षण्यांमध्ये वारंवार लघवी होणे हे महत्त्वाचे लक्षण आहे. त्वचेला खाज येणे. दृष्टी धुसर होणे. थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे, हाता पायांमध्ये बधीरपणा येणे किंवा मुंग्या येणे, अतिशय तहान लागणे, जखमा लवकर बऱ्या न होणे. ही मधुमेहाची काही लक्षणं आहेत.
मधुमेह अटोक्यात आणण्यासाठी काय करावे
आहाराकडे विशेष लक्ष
मधुमेह असलेल्या व्यक्तीने आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींला मधुमेह आहे, अशांनी दोन ते तीन तासांच्या अंतरामध्ये काहीतरी खाल्ले पाहिजे. सतत हेल्दी जेवण आणि स्नॅक्स खाल्ल्याने तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते. जेवणामध्ये ब्राउन राईस, ओट्स आणि ज्वारीचा समावेश करा. ब्रेड, पांढरे तांदुळ, नूडल्स आणि प्रक्रिया केलेले अन्न पूर्णपणे टाळा.
व्यायाम करा
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी नियमित शारीरिक व्यायाम करणे तितकेच महत्वाचे आहे. परंतु व्यायामापूर्वी आणि नंतर आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासा आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त किंवा कमी असेल तर व्यायाम करणे टाळा. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी शक्यतो चालण्याचाच व्यायाम करावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणास राहण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी केवळ त्वचेसाठीच नाही तर मधुमेहासाठी देखील उपयुक्त आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की दररोज 600 मिलीग्राम व्हिटॅमिन सी घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत होते. ज्या लोकांना तीव्र मधुमेह आहे. त्यांनी आपल्या आहारात दररोज व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले फळे खावीत. संत्री, किवी, मोसंबी, लिंबू आणि आंबा यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते.
भरपूर पाणी प्या
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी जास्त पाणी प्यावे, हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जास्त पाणी पिल्याने आपल्या शरीरातील साखरेची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते. शिवाय जास्त पाणी पिल्यामुळे आपण हेल्दी आणि निरोगी राहतो.
नियमित चेकअप करा
मधुमेह रुग्णांना नियमित घरी ब्लड शुगरची तपासणी केली पाहिजे. वर्षभरात कमीत कमी 3 ते 4 वेळा आपल्या डॉक्टरकडून नियमित तपासणी केली पाहिजे. याव्यतिरिक्त वर्षातून एकदा डोळे, किडनी, हृदय, पाय, शुगर, कोलेस्टेरॉल, लिव्हरसह संपूर्ण शरीराची तपासणी केली पाहिजे.
याच दिवशी का साजरा होतो मधुमेह दिवस
संयुक्त राष्ट्रसंघाने 2006 साली जागतिक मधुमेह दिन म्हणून मान्यता दिली. दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी सर फ्रेडरिक बंटिंग यांच्या जन्मदिनी मधुमेह दिवस साजरा केला जातो. सर फ्रेडरिक बंटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी 1922 मध्ये इन्सुलिनचा शोध लावला होता, पुढे याच इन्सुलिनवापर करून मधुमेहावर उपचार करण्यात आला.
संबंधित बातम्या :
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक