रात्री झोपताना या गोष्टीची घ्या काळजी, अन्यथा त्वचा होईल निस्तेज
दिवसा आपण चेहऱ्याची योग्य प्रकारे काळजी घेतो पण अनेकदा रात्री झोपताना चेहरा स्वच्छ करणे विसरून जातो. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. रात्री चेहरा स्वच्छ न धुतल्यामुळे त्वचेची चमक कमी होते आणि रंग फिकट होऊ लागतो.
आज कालच्या चुकीच्या जीवनशैलित त्वचेची योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे चेहरा आपोआपच निस्तेज होऊ लागतो. यासाठी अनेकजण महागड्या स्किन केअर प्रॉडक्ट चा वापर करतात. पण काही वेळा ही उत्पादने फायदेशीर ठरत नाहीत. कारण कधी कधी आपल्या निष्काळजीपणामुळे चेहरा निस्तेज होतो. या मागच्या सर्वात मोठे कारण म्हणजे अनेक वेळा आपण घाईघाईमध्ये झोपायला जातो आणि त्वचेवर दिवसभरात केलेला मेकअप हा तसाच राहतो. त्यामुळे त्वचेचे नुकसान होणे अत्यंत सामान्य आहे. जाणून घ्या अशाच काही टिप्स ज्या लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेऊ शकता. या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर तुमची त्वचा तजेलदार राहील आणि तुमचा रंग देखील उजळेल.
मेकअप न काढता झोपणे
जर तुम्ही रात्री मेकअप न काढता झोपलात तर त्वचेची छिद्रे बंद होता. ज्यामुळे मुरूम आणि त्वचेची चमक कमी होऊ लागते. त्यामुळे नेहमी मेकअप रिमूवर वापरा आणि चेहरा पूर्णपणे स्वच्छ करून मगच झोपा.
मॉइश्चरायझर न वापरणे
रात्रीच्या वेळी त्वचा स्वतःची दुरुस्ती करत असते परंतु मॉइश्चरायझर न लावल्याने ही प्रक्रिया मंदावली जाते. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार नाईट क्रीम किंवा हायड्रेटिंग मॉइश्चरायझर लावा. जेणेकरून तुमची त्वचा सकाळी उजळलेली दिसेल.
खराब उशीचा वापर
खराब उशीवर झोपल्यामुळे तुमच्या त्वचेवर बॅक्टेरिया आणि धुळीचा परिणाम होऊन मुरूम तयार होतात. त्यामुळे तुमच्या उशीवर असलेले कव्हर दर दोन ते तीन दिवसांनी बदलून स्वच्छ ठेवा.
नियमित त्वचा स्वच्छ न करणे
झोपण्यापूर्वी दिवसभरातील धूळ आणि घाण साफ करणे अत्यंत गरजेचे असते असे न केल्यास त्वचेवरील छिद्रे बंद होऊ शकतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी चेहरा फेस वॉशने धुवा आणि त्वचा स्वच्छ ठेवा.
स्किन केअर उत्पादनांचा अतिवापर
रात्रीच्या वेळी जास्त उत्पादने वापरल्याने त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते. दिवसभरातही तुम्ही स्किन केअर करताना कमीत कमी उत्पादनांचा वापर करा. त्वचेसाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादनांचा वापर करा जेणेकरून चेहरा चांगला दिसेल.
झोपताना चेहऱ्याला सतत स्पर्श करणे किंवा घासणे
झोपताना चेहऱ्याला वारंवार स्पर्श केल्याने बॅक्टेरिया पसरतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी हात आणि चेहरा स्वच्छ धुवा चोळू नका. आपला चेहरा हलक्या हाताने धुऊन स्वच्छ करा. जेणेकरून आपल्याला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.