लहान मुलांनाही होऊ शकतो High BP चा त्रास, तज्ज्ञांकडून जाणून घ्या लक्षणं
उच्च रक्तदाबाचा मुलांवर कसा परिणाम होतो, त्याची लक्षणे काय आहेत आणि अशा परिस्थितीत कोणते उपाय अवलंबले जाऊ शकतात हे सफदरजंग रुग्णालयातील वैद्यकीय विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ, जुगल किशोर यांनी सांगितले.
नवी दिल्ली: उच्च रक्तदाब (High Blood Pressure), मधुमेह (Diabetes) या आरोग्याच्या समस्या आजकाल खूप कॉमन आहेत. हा त्रास असलेले रुग्ण औषधं आणि खाण्यापिण्याची काळजी घेऊन त्यांचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. आजकाल उच्च रक्तादाबाची समस्या बऱ्यापैकी सामान्य होत आहे. खराब जीवनशैली (Bad lifestyle) आणि खाण्याच्या अयोग्य सवयी (food habits) हे त्यामागचे मुख्य कारण असू शकते. विशेष म्हणजे, उच्च रक्तदाबाचा आजार आता लहान मुलांमध्येही (high bp in children) दिसून येत आहे. उच्च रक्तदाब, ज्याला वैद्यकीयदृष्ट्या हायपरटेन्शन म्हटले जाते, त्याची वाढ लक्षणीयरित्या होत आहे.
उच्च रक्तदाबाचा मुलांवर कसा परिणाम होतो, त्याची लक्षणे काय आहेत आणि अशा परिस्थितीत कोणते उपाय अवलंबले जाऊ शकतात हे सफदरजंग रुग्णालयातील वैद्यकीय विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ, जुगल किशोर यांनी सांगितले. ते जाणून घेऊया .
मुलांमध्ये उच्च रक्तदाबाची ही लक्षणे दिसतात
डॉ. किशोर यांच्या सांगण्यानुसार, लहान मुलांमध्ये उच्च रक्तदाबाची लक्षणे थेट दिसत नाहीत. डोकेदुखी, चिडचिडेपणा आणि ताण-तणाव यासारखी लक्षणे मुलांमध्ये दिसू शकतात.
तुमच्या मुलाच्या डोक्यात सतत वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका, असे डॉ. किशोर यांनी नमूद केले. अशी कोणतीही लक्षणे मुलांमध्य दिसू लागल्यास त्यांना तातडीने डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्यावर योग्य उपचार करून घ्या.
मुलांना उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याचे कारण
लहान मुलांमध्ये हायपरटेन्शनची प्रकरणे वाढत आहेत, आणि त्यामागचे मुख्य कारण आहे स्ट्रेस (तणाव), असे डॉ. किशोर यांनी सांगितले. पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यालाही उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. अभ्यासाचं ओझं, कुटुंबियांचा दबाव अशा कारणांमुळे मुलं या गंभीर आजाराला बळी पडू शकतात.
मुलांची शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळेही ते पटकन आजारी पडू शकतात. मुलं घरात राहून मोबाईलवर खेळण्यात किंवा टीव्ही बघण्यात जास्त वेळ घालवत आहे. यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो आणि हळूहळू त्यांना स्ट्रेस येऊ लागतो.
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. आजकाल पालक त्यांचे टेन्शन कमी करण्यासाठी किंवा मुलांनी त्रास देऊ नये यासाठी, मुलांना पॅकबंद पदार्थ किंवा जंक फूड खायला देतात.
यामुळे मुलांची इच्छा पूर्ण होते, पण त्यांच्या आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते, असे डॉ. किशोर यांनी सांगितले.
मुलांचे उच्च रक्तदाबापासून संरक्षण कसे करावे?
जर तुम्हाला तुमच्या मुलाला उच्च रक्तदाब किंवा इतर आजारांपासून वाचवायचे असेल तर त्यांच्याबरोबर बागेत जाऊन खेळा , त्यांची शारीरिक ॲक्टिव्हिटी वाढवा. तसेच मुलांनी दिवसातून एकदा हिरवी भाजी खाल्लीच पाहिजे.
जंक फूड किंवा पॅकबंद पदार्थ न खाणे, त्यांच्या पासून दूर राहणे हे केवळ मुलांसाठीच नव्हे तर प्रौढांसाठीही खूप फायदेशीर ठरू शकते. जेव्हा पालक त्यांच्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यात सावधगिरी बाळगतील, तेव्हाच मुलांमध्ये उच्च रक्तदाबाची प्रकरणे कमी होतील, असे तज्ञांचे म्हणणे आहे.