World Heart Day 2022: ‘हे’ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना हार्ट ॲटॅकचा जास्त धोका!
एका संशोधनानुसार, तुम्ही तुमच्या ब्लड ग्रुपच्या (रक्तगट) आधारे हृदयरोगाच्या जोखमीचा अंदाज लावू शकता. काही रक्तगटांमध्ये हृदयरोगाचा धोका अधिक असल्याचे आढळून आले आहे.
नवी दिल्ली: जगभरातील लोकांमध्ये हृदयरोगा संबंधातील आजार वाढत आहेत. जगभरात दरवर्षी हृदय रोगाच्या (heart disease) आजारात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मोठ्या माणसांसह आता लहान मुलांमध्येही हृदय विकाराच्या केसेस दिसून येत आहेत. हृदयरोगामुळे अनेक सेलेब्रिटींनीही (celebrity) लहान वयातच या जगाचा निरोप घेतला आहे. तज्ञांच्या मते, खराब जीवनशैली (bad lifestyle) आणि अयोग्य आहार (food habits) ही हृदयरोगाची मुख्य कारणे आहेत. मात्र, अलीकडेच झालेल्या एका संशोधनानुसार, तुम्ही तुमच्या ब्लड ग्रुपच्या (रक्तगट) (blood group)आधारे हृदयरोगाच्या जोखमीचा अंदाज लावू शकता. काही रक्तगटांमध्ये हृदयरोगाचा धोका अधिक असल्याचे आढळून आले आहे.
काय आहे संशोधनातील माहिती?
अमेरिकन हार्ट असोसिएशनने नुकतंच एक संशोधन केले आहे. त्या संशोधनाच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, आता लोक त्यांच्या रक्तगटाच्या आधारेदेखील हृदयरोगाच्या जोखमीबद्दल अंदाज लावू शकतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनने आपल्या अहवालात असे म्हटले आहे की, काही विशिष्ट रक्तगट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचे आढळले आहे. हृदयरोगाचा धोका आहे की नाही हे सांगण्यासाठी रक्तगट देखील उपयुक्त ठरू शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
या रक्तगटाच्या लोकांना अधिक धोका
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अहवालात असे म्हटले आहे की टाइप ए रक्तगट, टाइप बी किंवा टाइप एबी रक्तगट असलेल्या लोकांना ओ रक्तगट असलेल्या लोकांपेक्षा हृदयरोग होण्याचा धोका जास्त असतो. संशोधकांनी असा दावा केला आहे की हे रक्तगट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. ज्या लोकांचा रक्तगट ओ आहे, त्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो, असेही संशोधनातून समोर आले आहे.
ए व बी रक्तगट असलेल्या रहावे सावध
संशोधकांच्या मते, ज्या लोकांचे रक्तगट ए आणि बी आहेत त्यांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे रक्तगट असलेल्या लोकांना इतर रक्तगट असलेल्या लोकांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. या लोकांना हार्ट ॲटॅक येण्याची शक्यता 8 टक्के अधिक असते.
(टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)