Monsoon Health Tips : आला पावसाळा, तब्येत सांभाळा ; 5 रोगांपासून असा करा बचाव
पावसाळ्यात थंडगार वातावरणात निसर्गाचे सौंदर्य खुललेले असते. पण हाच पाऊस त्याच्यासोबत बरेच आजारही घेऊन येतो. या काळात सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार तर सामान्यपणे होतातच. आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.
मुंबई : पावसाळ्यात (Rainy Season) थंडगार वातावरणात निसर्गाचे सौंदर्य खुललेले असते. उन्हाळ्यामुळे त्रासलेली झाडे, वेली,पशु-पक्षी पावसामुळे तृप्त होतात, सगळीकडे सुखद थंड वातावरण असते. पण हाच पाऊस एकटा येत नाही तर त्याच्यासोबत अनेक आजारही घेऊन येतो. जागोजागी साचलेले पाणी, चिखल, डबकी यामुळे जंतूंचेही फावते. सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार तर होतातच. या काळात थोडाही निष्काळजीपणा केल्यास आपले आरोग्य धोक्यात येते आणि डॉक्टरांकडे (Doctor) फेऱ्या सुरु होतात. त्यामुळे पावसाळ्यात खाण्यापिण्यासोबतच स्वच्छतेचीही काळजी (Care in rainy season) घ्यावी लागते. घरी शिजवलेले ताजे अन्न खाणे, बाहरेचे उघड्यावरील चमचमीत पदार्थ खाणे टाळणे, बाहेरुन आल्यावर हात-पाय स्वच्छ धुणे, पावसात भिजल्यास पूर्ण शरीर आणि डोकं कोरडं करणे, अशी काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे.
आजारातून वाचण्यासाठी वेळीच उपाययोजना करा
त्वचा रोग –
पावसाळ्यात लोकांना चर्म रोग (त्वचा विकार) , घामोळे, फोड येणे आदी त्रास होण्याची शक्यता अधिक असते. हे सर्व फंगल इन्फेक्शन असू शकते, ज्याचे कारण असते पाण्यामुळे निर्माण होणारा ओलावा. पावसात शक्यतो बाहेर फिरू नये, वेळ आलीच तर छत्री, रेनकोटचा पूर्ण वापर करावा. त्यातूनही जर पावसात भिजणे झाले, तर घरी आल्यावर अंग स्वच्छ पुसून, त्वचा कोरडी करावी. हाता-पायांच्या बोटातील जागा, काखेतील जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. तरीही त्वचेला खाज सुटल्यास किंवा इन्फेक्शन झाल्यासारखे वाटल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे आणि औषधोपचार करावेत. त्वचेच्या आजाराकडे दुर्लक्ष करणे भविष्यात महागात पडू शकते.
डोळ्यांचे विकार
पावसाळ्यात हमखास होणारा आणखी एक आजार म्हणजे डोळ्यांचे विकार. डोळयात जळजळ होणे, डोळे सुजणे, पाणी येणे, डोळे एकमेकांना चिकटणे, डोळ्यात वेदना होणे, हे सर्व डोळ्यांच्या आजाराचे लक्षण आहे. या आजारापासून वाचण्यासाठी डोळे थंड पाण्याने वारंवार स्वच्छ धुतले पाहिजेत. तसेच डोळे सतत चोळू नका, त्यांना हात लावू नका. डोळ्यांमध्ये नियमितपणे गुलाबजल घातले पाहिजे. डोळ्यांना इन्फेक्शन झाल्यास त्वरित नेत्रतज्ञांना दाखवा. कोणताही हलगर्जीपणा करू नका.
पोट बिघडणे
पचनक्रिया कमकुवत झाल्याने पोट बिघडणे, हा पावसाळ्यात हमखास होणारा आजार आहे. पावसाळ्यात डायरिया, उलटी होणे, जुलाब यांसारख्या आजारामुळे लोक त्रस्त होतात. त्यामुळे या काळात खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. घरी शिजवलेले ताजे अन्न खावे, बाहरेचे उघड्यावरील चमचमीत पदार्थ खाणे टाळले पाहिजे. पोटाचा त्रास असल्यास घरी हलका आहार घ्यावा. तसेच अन्नपचन चांगले होण्यासाठी जेवणानंतर थोड्या वेळ फेऱ्या मारल्या पाहिजेत.
मलेरिया व डेंग्यूचा धोका
मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेले असते. त्या पाण्यात अनेक जंतू असतात. साचलेल्या पाण्यात डासांची संख्या वाढते. तेच डास मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजारांना कारणीभूत ठरतात व त्यांचा प्रसार करतात. डेंग्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्तपेशी कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळे हा आजार जीवघेणा ठरु शकतो. म्हणूनच या आजारांपासून वाचण्यासाठी डास मारण्याचे औषध फवारले पाहिजे. संध्याकाळ होण्यापूर्वी घराचे दरवाजे, खिडक्या बंद केल्या पाहिजेत. तसेच घराच्या आसपास, झाडांमध्ये व रस्त्यावर पाणी जमा होऊ देऊ नये.
अन्नातून होणारी विषबाधा
पावसाळ्याच्या दिवसात अन्नातून विषबाधा होण्याचाही धोका असतो. त्यामध्ये पोटात दुखणे, उलटी होणे, जुलाब होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे रुग्णाला गळल्यासारखे वाटणे, ताकद कमी होणे, असे वाटू शकते. या आजारात शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळेही त्रास होतो. अशा अवस्थेकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांना दाखवून औषध घ्यावे. तसेच साधे, पचायला हलके अन्न खावे. कच्चे अन्न, सॅलड वगैरे खाऊ नये. रस्त्यावरील चमचमीत पदार्थ खाणे टाळावे. विशेष म्हणजे पावसाळा असो वा उन्हाळा, भाज्या, फळे नेहमी स्वच्छ धुवूनच खावीत.