Phlegm Home Remedies: घशातील खवखव आणि कफ दूर करण्साठी करून पहा ‘ हे ‘ घरगुती उपाय
गळ्यात वेदना होणे, घसा खवखवणे आणि कफ होणे, या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करून पहा.
नवी दिल्ली: कफ (cough) हा असा एक चिकट पदार्थ आहे जो श्वसन नलिकेच्या खालच्या भागात आणि फुप्फुसात जमा होऊ लागतो. पावसाळा आणि हिवाळ्याच्या (winter season) दिवसात साधारणत: घसा खवखवणे आणि कफ होणे, या समस्या उद्भवू लागतात. काहीही थंड पदार्थ खाल्ला किंवा प्यायला तर हा त्रास अजूनच वाढतो. काही घरगुती उपायांच्या मदतीने घशाची खवखव (Sore Throat आणि कफ (Phlegm) यांच्यापासून मुक्ती मिळू शकते. तसेच सर्दी-खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठीही हे उपयुक्त ठरेल. ते घरगुती उपाय कोणते हे जाणून घेऊया.
ओलं कापड
घशात खवखव होणे आणि कफ जमा होणे यामुळे गळा व नाक कोरडे पडू लागते. त्यामध्ये ओलावा रहात नाही. गळा व नाक यामध्ये ओलावा रहावा यासाठी गरम पाण्यात एखादा स्वच्छ रुमाल किंवा टॉवेल बुडवावा. नंतर तो घट्ट पिळून घ्यावा आणि ते कापड नाकावर ठेवून दीर्घ श्वास घ्यावा. या कापडाने चेहरा, नाक व गळ्याला शेक दिल्याने आराम जाणवतो आणि गळ्यात वेदना होत असतल तर त्यापासूनही आराम मिळेल.
गरम पाणी
एक ग्लास पाणी घेऊन ते गरम करावे व त्यामध्ये मीठ घालावे. त्या मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. घशात वेदना होत असतील तर दिवसातून 2-3 वेळा गरम पाण्याने गुळण्या करू शकता. यामुळे तुमच्या घशातील वेदना कमी होऊन आराम मिळेल. तसेच गरम पाण्यानेच आंघोळ करावी. दिवसभरात पाणी पिण्यासाठीही गरम पाण्याचाच वापर करावा.
काढ्याचा करा वापर
घशात खवखव अथवा वेदना होत असतील तर काढा प्यावा. हा काढा बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये दालचिनी, आलं, तुळशीची पाने आणि काळी मिरी घालून ते पाणी चांगले उकळावे. हा काढा तयार झाल्यावर त्यामध्ये थोडासा गूळ किंवा मध घालता येऊ शकतो. हा काढा प्यायल्याने गळ्यातील खवखव तसेच खोकल्याची समस्या दूर होऊ शकते. तसेच घसा बसलेला असल्यास तोही मोकळा होतो.
मध
गळ्यातील खवखव दूर करण्यासाठी मधाचा वापर करता येऊ शकतो. मधामध्ये असलेले (Honey) अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म हे गळ्यातील खवखव आणि वेदना दूर करण्यात उपयुक्त ठरतात. तसेच तुम्ही आलं आणि मध यांचेही एकत्र सेवन करू शकता. किंवा एक चमचा मध खाऊ शकता. मधाच्या सेवनाने घशाला आराम मिळतो.