Dental Tips: रात्री अचानक दात दुखू लागतो? या घरगुती उपायांमुळे मिळेल आराम
कितीतरी वेळा जेवताना दातात काही अडकल्यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात. रात्रीच्या वेळेस या वेदना सुरू झाल्यास नीट झोपही मिळत नाही. अशावेळी काही घरगुती उपयांनी हे दुखणं थांबवता येऊ शकतं.
Remedies for Toothache : दातांमध्ये वेदना होणे (Toothache) ही एक सामान्य समस्या असली तरी त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. अति थंड वा अति गरम पदार्थ खाणे, शरीरात कॅल्शिअमची कमतरता असणे, दात किडणे अथवा त्यामध्ये बॅक्टेरिअल इन्फेक्शन (Bacterial Infection) होणे, या व अशा अनेक कारणांमुळे दातदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो. कितीतरी वेळेस जेवताना दातात काही अडकल्यास वेदना होऊ शकतो. विशेषत: रात्रीच्या वेळेस या वेदना झाल्यास तुमच्यासह संपूर्ण घराचीही झोप उडू शकते. दिवसा दातदुखी सुरू झाली तर त्वरित डॉक्टरांकडे अथवा मेडिकलमध्ये जाऊन काही औषधे (Medicines) आणता येतात. मात्र रात्रीच्या वेळेस ही समस्या उद्भवल्यास डॉक्टरांकडे जाणे प्रत्येक वेळेस शक्य होईलच, असे नाही. अशावेळी काही घरगुती उपायांचा (Home Remedies) अवलंब करून दाताचे दुखणे कमी करता येऊ शकतं. खालील काही उपायांनी दातांच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो.
लसूण –
मेडिकल न्यूज टुडेनुसार, दाताचे दुखणे थांबवण्यासाठी लसूण (Garlic) प्रभावी ठरते. घराघरांत लसूण सहजरित्या उपलब्ध असते. त्यामधील ॲलिसिन हे तोंडातील बॅक्टेरियाविरोधात लढते आणि त्यांचा नायनाट करते. बॅक्टेरियामुळे दाताला कीड लागण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे दातांमध्ये वेदना देखील होऊ शकतात. दातदुखी सुरू झाल्यास लसणाची एक पाकळी सोलून ती दातामध्ये दाबून धरावी. थोड्याच वेळात वेदनेपासून आराम मिळेल.
कोल्ड कंप्रेस –
कोल्ड कंप्रेस म्हणजे बर्फाचे ( Ice) तुकडे घेऊन, त्याच्या सहाय्याने दात शेकणे. दात दुखत असल्यास या उपायाचा अवलंब जरूर करावा. बर्फाने दात शेकल्यास रक्तवाहिन्यांवर दाब पडतो व वेदनेपासून आराम मिळतो. एका टॉवेलमध्ये बर्फाचे काही तुकडे घ्यावेत आणि जिथे वेदना होत असतील तिथे शेकावे.
पेपरमिंट चहा –
पेपरमिंट मध्ये ॲंटी-बॅक्टेरिअल आणि ॲंटी- ऑक्सीडेंट गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. पेपरमिंट मधील मेंथॉलमुळे वेदना होत असलेला भाग काही काळ सुन्न होतो व दुखण्यापासून आराम मिळतो. दातात वेदना सुरू झाल्यास पेपरमिंटचा चहा जरूर प्यावा.
लवंग –
लवंगमध्ये यूजेनॉल असते, ज्यामुळे दातांवरील सूज कमी करण्यात आणि वेदना दूर करण्यात मोठी मदत मिळते. दात दुखू लागल्यास अथवा दातात वेदना सुरू झाल्यास लवंगांची पूड करून तोंडात ठेवावी. किंवा लवंगचा एक तुकडा दातात दाबून ठेवावा. त्यामुळे वेदनांपासून मुक्ती मिळते.
( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. )