Homemade Hair Oils: लांब व मजबूत केसांसाठी वापरून पहा हे घरगुती तेल !

| Updated on: Sep 09, 2022 | 7:53 PM

निरोगी, लांब व मजबूत केस हव असतील तर तुम्ही घरी तयार केलेले तेल वापरू शकता. हे होममेड ऑईल वापरल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. हे तेल घरी कसे बनवावे, हे जाणून घेऊया.

Homemade Hair Oils: लांब व मजबूत केसांसाठी वापरून पहा हे घरगुती तेल !
Follow us on

आजकाल बऱ्याच स्त्रियांना केस गळण्याची (Hair Fall Problem) समस्या सतावत असते. खराब जीवनशैली, ताण, अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच धूळ, प्रदूषण या सर्वांचा केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. ते कमकुवत होऊन गळायला लागतात, अवेळी पांढरे व निर्जीवही होतात. अशा वेळी बरेच जण केमिकलयुक्त प्रॉडक्टसचा केसांसाठी वापर करतात. मात्र त्याने परिस्थिती आणखीनच बिघडू शकते. केमिकल्समुळे केसांचे आणखीनच नुकसान होऊ शकते. अशा वेळी काही घरगुती उपायांनी (Home remedies) तुम्ही या समस्या कमी करू शकता. घरी तयार केलेल्या विशेष तेलाचा (homemade oil) वापर तुम्ही केसांसाठी करू शकता. त्यामुळ केस घनदाट, मजबूत आणि निरोगी बनतात. हे तेल घरी कसे तयार करावे, जाणून घेऊया.

काळ्या जिऱ्याचे तेल

यासाठी एका पॅनमध्ये 4 ते 5 कप पाणी गरम करावे. त्यामध्ये 2 मुठी काळं जिरं घालावं. हे पाणी 10 मिनिटं उकळू द्यावं. नंतर गॅस बंद करून ते थंड होऊ द्यावे व गाळून घ्यावे. नंतर त्यामध्ये व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल घालून ते मिश्रण नीट एकत्र करावे व एखाद्या बाटलीत ठेवावे. हे तेल नियमितपणे वापर करावा. त्यामुळे केस गळणे कमी होतो तसेच केस मऊ व मुलायम होतात. त्यांची वाढही चांगली होते.

कढीपत्ता व नारळाचे तेल

कढीपत्त्यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात. तो केसांच्या वाढीसाठीही पोषक मानला जातो. हे तेल करण्यासाठी कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत आणि उन्हात कडकडीत वाळवावीत. नंतर ती पाने नारळाच्या तेलामध्ये घालून एक उकळी आणावी. तेल थंड झाल्यावर गाळून घ्यावे व त्याचा वापर सुरू करावा. यामध्ये ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. तसेच अमीने ॲसिडही असते. हे तेल वापरल्यामुळे केसांची मुळं बळकट होतात व केसगळती रोखण्यास मदत होते. कढीपत्यामधील बीटा-कॅरोटिन आणि प्रोटीनमुळे केस वाढण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

कडुलिंब व बदामाचे तेल

कडुलिंब हे ॲंटी-फंगल आणि ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्मांनी युक्त असते. त्यामुळे केसांचे नुकसान करणारे घटक रोखले जातात. हे तेल तयार करण्यासाठी कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून उन्हात 1-2 दिवस कडकडीत वाळवावीत. नंतर ही पाने बदामाच्या तेलात घालून ते चांगले उकळावे. एक आठवडा हे तेल तसेच राहू द्यावे. कडुलिंबाचा अर्क तेलात चांगला उतरल्यानंतर हे तेल गाळून घ्यावे.त्यानंतर हे तेल केस व स्काल्पसाठी वापरावे. या तेलाच्या नियमित वापरामुळे केस मजबूत होतात तसेच कोंड्याची समस्याही दूर होते.

कलौंजीच्या बिया व नारळाचे तेल

एक चमचा कलौंजीच्या बिया एका बाटलीत टाकाव्यात. आता त्यामध्ये नारळाचे तेल ओतावे. हे तेल काही दिवस तसेच राहू द्यावे. नंतर ते थोडं गरम करून घ्यावे. त्याचा नियमितपणे केसांसाठी वापर करावा. केसगळती कमी होते.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)