वयाची पन्नाशी ओलांडलेल्या अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमणचं (Milind Soman) फिटनेस हे तरुणांनाही लाजवणारं आहे. वर्कआऊट रुटीन (Workout Routine) आणि आहाराचे विविध फोटो, व्हिडीओ तो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. शहरी जीवनातील गोंधळापासून दूर निसर्गरम्य वातावरणात धावताना, सायकल चालवताना तर कधी पुशअप्स करतानाचे फोटो आणि व्हिडीओ मिलिंद इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो. केवळ मिलिंद सोमणच नाही तर त्याची पत्नी अंकिता कोनवार आणि आई उषा सोमण यासुद्धा फिटनेसच्या बाबतीत जागरूक असतात. वयानुसार शरीरातील स्नायू कमकुवत होतात. म्हणून त्याविषयी काळजी घेणं खूप आवश्यक असतं. नुकतंच मिलिंदने इन्स्टाग्रामवर समुद्रकिनारी धावतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने नेटकऱ्यांना लाखमोलाचा सल्ला दिला आहे. पन्नाशी ओलांडल्यानंतर कशाप्रकारचे वर्कआऊट करावेत, ते करताना दुखापत होऊ नये याची काळजी कशी घ्यावी याबद्दल त्याने लिहिलं आहे. (Fitness)
दुखापतीचा धोका कमी करण्याचा मूलमंत्र म्हणजे नैसर्गिकरित्या हालचाल करणं आणि संयम राखणं. मी दररोज धावत नाही, परंतु मी दररोज 15-20 मिनिटे व्यायाम आवर्जून करतो, जेणेकरुन मला दुखापत न होता मला पाहिजे ते करता येईल. जसं वय वाढत जातं, तसे तुम्ही कमकुवत होत जाता आणि त्यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नियमित व्यायाम करणं. हा व्यायाम कोणताही जोर न लावता करत राहणं. आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी सर्वोत्कृष्ट व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार – हे तुम्ही कराल तितकं सोपं किंवा अवघड असू शकतं. शरीरात चांगलं रक्ताभिसरण होत राहणं आणि तुम्हाला हवं तसं तुमच्या शरीराची हालचाल कोणत्याही त्रासाशिवाय करता यावी.. ही दोन व्यायामाची मूलभूत उद्दिष्टे आहेत.
दररोज थोड्याफार प्रमाणात व्यायाम करणं हे शरीरासाठी कधीही चांगलंच. या गोष्टीचा अतिरेक न करता जमेल तितकं करत राहिल्यास त्याचे परिणाम निश्चित दिसून येतात, हेच मिलिंदने यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा:
Eye care: वाढत्या वयातही ‘या’ चार पध्दतीने डोळ्यांची कार्यक्षमता सुधारा
ग्रीन टी बॅग्ज्चा ‘पैसा वसूल’ वापर ! त्वचेपासून केसांपर्यत अनेक फायदे