किती पाणी पिणे धोकादायक?; तुम्हाला हे प्रमाण माहीत आहे का?
शरीरासाठी पाणी आवश्यक असले तरी, जास्त पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. 'जललहरी' (हायपोनॅट्रिमिया) हा आजार जास्त पाणी पिल्याने होतो. यामुळे रक्तातील सोडियमची पातळी कमी होते आणि मेंदू आणि इतर अवयवांना धोका निर्माण होतो. पुरूषांसाठी दिवसाला 3.7 लिटर आणि महिलांसाठी 2.7 लिटर पाणी पिण्याचा सल्ला आहे. परंतु, शारीरिक हालचाली आणि हवामान यानुसार हे प्रमाण बदलू शकते. लक्षणे दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा.
शरीरासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाण्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांना दूर ठेवलं जातं. उन्हाळ्यात तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शरीरात पाणी किती महत्त्वाचे आहे, याबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे. तसेच, चांगल्या त्वचेच्या रहस्याबद्दल विचारल्यास, पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यानेच त्वचा उजळत असल्याचं अनेक सेलिब्रिटी सांगतात. डॉक्टर आणि पालक सर्वसाधारणपणे मुलांना अधिक पाणी पिण्यास प्रोत्साहित करतात.
पाणी पिण्याची आवश्यकता सर्वांना माहीत असली तरी, आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिणे धोकादायक ठरू शकते, हे बहुतांश लोकांना माहीत नाही. ‘मद्यलहरी’ प्रमाणेच ‘जललहरी’ (हायपोनॅट्रिमिया) हाही एक शब्द आहे. जललहरी म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत.
‘हायपोनॅट्रिमिया’ किंवा जललहरी
एखादी व्यक्ती कमी वेळात जास्त पाणी पिते त्याला ‘हायपोनॅट्रिमिया’ किंवा ‘जललहरी’ म्हणतात. अशावेळी शरीरात पाणी जास्त प्रमाणात गेले की रक्तातील सोडियमची मात्रा कमी होऊ लागते. शरीरातील सोडियम, कोशिकांच्या बाहेरील आणि आतल्या मात्रेचे नियंत्रण करते. त्यामुळे जेव्हा अशा वेळी पाणी अधिक प्रमाणात शरीरात जातं आणि किडनी हे पाणी बाहेर टाकू शकत नाहीत, तेव्हा हे पाणी कोशिकांमध्ये प्रवेश करुन त्यांना फुगवते. यामुळे मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांच्या पेशींवर परिणाम होऊ शकतो.
किडन्या एका तासात 0.8 ते 1 लिटर पाणीच बाहेर टाकू शकतात. अधिक पाणी शरीरात गेल्यावर ते कोशिकांमध्ये जमा होऊन त्या फुगू लागतात. त्याचा परिणाम मेंदूतील पेशींवरही होऊ शकतो. त्यामुळे सिरिब्रल एडिमा (मेंदूत सूज) होऊ शकते. यामुळे डोकेदुखी, गोंधळ, बेशुद्धता, कॉमा, आणि मृत्यूपर्यंत सुद्धा गंभीर स्थिती होऊ शकते.
लक्षणांवर लक्ष ठेवा
उलटी, डोकेदुखी, संभ्रमावस्था, थकवा, स्नायू दुखणे, किंवा बद्धकोष्ठता यासारखी लक्षणे दिसल्यास आपण काळजी घ्यायला पाहिजे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे कोमामध्ये जाण्याची शक्यता वाढते.
किती पाणी प्यावं?
पाणी पिण्याचे प्रमाण वातावरण आणि शरीराच्या शारीरिक स्थितीनुसार वेगळे असू शकते. तथापि, सामान्यतः, दिवसातील पाणी पिण्याचे प्रमाण पुढील प्रमाणे आहे:
पुरुषांसाठी : 3.7 लिटर.
यात इतर पिण्याचे पदार्थ आणि आहारातील पाणी देखील समाविष्ट आहे.
महिलांसाठी : 2.7 लिटर
हे प्रमाण सामान्य असले तरी, जास्त शारीरिक श्रम करणारे व्यक्ती किंवा उष्ण वातावरणात राहणाऱ्या व्यक्तींना पाणी अधिक पिणे आवश्यक असते, कारण ते अधिक द्रावण गमावतात.