डीएमडी आजार नेमका काय आहे? ज्याला वैतागून भाजपच्या नेत्याने केली कुटुंबासह आत्महत्या
डीएमडीवर कोणताही इलाज नाहीये. त्यामुळे भाजप नेता आपल्या मुलांची परिस्थिती पाहून प्रचंड त्रस्त होता. त्यामुळे त्यांना प्रचंड नैराश्य आलं होतं. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं.
भोपाळ: मध्यप्रदेशातील विदिशा येथे भाजप नेते संजीव मिश्रा यांनी आपल्या मुलाच्या एका गंभीर आजारामुळे वैतागून आत्महत्या केली. मिश्रा यांनी पत्नी आणि दोन्ही मुलांसह आत्महत्या केली. मिश्रा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी आपलं नैराश्य आणि हतबलता मांडली होती. ईश्वराने, कुणालाही डचेन मस्कुलर डिस्ट्रॉफी (डीएमडी) आजार देऊ नये. या आजारावर काहीच उपचार नाहीये, असं त्यांनी म्हटलं होतं. या आजारावर कोणताच उपचार नसल्याने त्यांनी आत्महत्या केली होती.
भाजप नेत्याने एमडी डीएमडी आजारामुळे एवढं टोकाचं पाऊल का उचललं? आजारावर काहीच उपचार नाहीत का? हा आजार कसा होतो? कशामुळे होतो? यावर तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. याबाबत टीव्ही9 भारतवर्षने सफदरजंग हॉस्पिटलच्या मेडिसीन विभागाचे डॉ. रजत कुमार यांच्याशी संवाद साधला असता रजत कुमार यांनी महत्त्वाची माहिती दिली.
तिसऱ्या पिढीतही आजार येतो
एखाद्याच्या शरीरात डायस्ट्रोफिन नावाचं प्रोटिन कमी झाल्यावर डचेन मस्कुलर डिस्ट्रॉफी आजार होतो. हे एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. ज्यांच्या कुटुंबात जर कुणाला हा आजार झाला असेल तर त्या कुटुंबाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतही हा आजार होण्याची शक्यता असते.
रुग्ण दिव्यांग होतो
डीएमडीची लक्षणे वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच दिसू लागतात. या आजारामुळे शरीरातील हाडे आणि मांसपेशी कमकुवत होतात. त्यामुळे रुग्णाला चालण्या फिरण्यापासून ते बसण्यापर्यंत त्रास होतो. शरीराच्या सर्व अॅक्टिव्हिटीवर त्याचा परिणाम होतो.
एक प्रकारे रुग्ण दिव्यांग होऊ लागतो. या आजाराचा कोणताच इलाज नाही. केवळ या आजाराची लक्षणे कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. ही औषधे प्रचंड महागडी असतात, असं डॉ. रजत कुमार यांनी सांगितलं.
सर्वाधिक लागण पुरुषांना
डीएमडीची सर्वाधिक लागण पुरुषांना होते. लहान मुलांमध्ये वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच ही लक्षणे दिसतात. त्यामुळे मुलांचा विकास योग्य प्रकारे होत नाही. मुलांची हाडे कमकुवत होतात. वयाच्या तिसऱ्या ते चौथ्या वर्षापासून या आजाराची लक्षणे अधिक वेगाने वाढू लागतात. हा एक दुर्मीळ आजार आहे. पाच हजार मुलांमध्ये एखाद्या मुलाला हा आजार होण्याची शक्यता असते.
संशोधकांनाही अपयश
डीएमडीमुळे मांसपेशींचा विकास योग्य प्रकारे होत नाही. त्याचा परिणाम इतर अवयवांवरही पडतो. हृदय आणि यकृताचे कार्य बिघडतं. त्यामुळे रुग्णाचं आयुष्य एक आव्हान बनतं. कारण मुल पाच वर्षाचं होईपर्यंत या आजाराची लक्षणे अधिक गंभीर झालेली असतात. भारतात या आजारावर कोणताही इलाज नाहीये. संशोधकांनी या आजारावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलेलं नाहीये.
हताश होऊ नका, धैर्य ठेवा
डीएमडीवर कोणताही इलाज नाहीये. त्यामुळे भाजप नेता आपल्या मुलांची परिस्थिती पाहून प्रचंड त्रस्त होता. त्यामुळे त्यांना प्रचंड नैराश्य आलं होतं. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. संपूर्ण कुटुंबासह त्यांनी आत्महत्या केली.
मात्र, लोकांनी हताश होऊ नये. धैर्य ठेवावं. आजाराचा सामना करावा. डीएमडीवर कोणताही इलाज नाही. पण या आजाराची गंभीरता कमी करता येते, असं मनोरोग तज्ज्ञ डॉ. राजकुमार यांनी सांगितलं.