Safety Tips: थंडीत हीटर वापरताना घ्या ही काळजी, अन्यथा होऊ शकते मोठी दुर्घटना
थंडीच्या दिवसात उबदारपणा मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात. अशा वेळी घरात उबदार वातावरण रहावे यासाठी रूम हीटरचा सर्वाधिक वापर केला जातो. मात्र या हीटरचा वापर करताना काळजी घेणे अत्यावश्यक आहे, अन्यथा दुर्घटना होऊ शकते.
नवी दिल्ली – हिवाळ्याला सुरूवात झाली (winter season) असून वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. हिवाळा सुरू होताच लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि उबदार राहण्यासाठी अनेक उपाय करू लागतात. काही लोक गरम पाण्याने आंघोळ करातात, तर काही लोक रूम हीटर (room heater) सतत वापरू लागतात. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा प्रभाव वाढल्याने हीटरचा ट्रेंडही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकं सतत हीटरचा वापर करत आहेत. बहुतेक लोक घर किंवा त्यांची खोली गरम करण्यासाठी बंद जागेत हीटर सुरू करतात, मात्र अशा वेळी खूप काळजी घेणे (precaution) गरजेचे असते.
तुम्हीही रूम हीटर वापरत असाल तर सावध राहून योग्य ती काळजी घ्या अन्यथा त्रास होऊ शकतो. खरंतर बंद खोलीत हीटर वापरताना अनेक गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करून हीटरचा वापर केला तर एखादी दुर्घटना होऊन ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणूनच, बंद जागेत हीटर वापरताना योग्य ती खबरदारी घ्या. हीटर वापरताना थोडासाही निष्काळजीपणा केल्यास ते फार घातक ठरू शकते.
– थंडीच्या दिवसात हीटर वापर करायचा असेल तर थंडी सुरू होण्यापूर्वी हीटर पूर्णपणे व नीट स्वच्छ करावा. दीर्घकाळ वापरामुळे वीजेच्या उपकरणांचे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे कोणतीही वस्तू, अथवा हीटर वापरण्यापूर्वी तो स्वच्छ करून घ्यावा.
– हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी हीटर वापरण्यापूर्वी त्याची नीट तपासणी करावी. वास्तविक, हीटर फक्त हिवाळ्यातच वापरला जातो. बरेच महिने बंद राहिल्याने त्यात काही बिघाड होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची नीट तपासणी केल्यानंतरच त्याचा वापर सुरू करावा.
– जेव्हा तुम्ही बंद खोलीत रूम हीटर वापरता तेव्हा हीटरच्या जवळपास कोणतीही चादर अथवा कापड ठेऊ नये. रजई, ब्लँकेट, चादर किंवा इतर कोणतेही कपडे हे हीटरपासून 5 फुटांपेक्षा लांब ठेवावेत. खरंतर हीटर जवळ एखादे कापड ठेवल्यास आग लागून मोठी दुर्घटना होण्याचा धोका असतो.
– तसेच हीटर वापरताना स्विच बोर्डवर अती दाब येणार नाही किंवा तो ओव्हरलोड होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. कारण ओव्हरलोड झाल्यास हीटरचा स्फोट होण्याची शक्यता असते, ज्यामुळे आग लागू शकते, दुर्घटना घडू शकते.