जपानमधील मुलं सर्वाधिक निरोगी का असतात? समोर आले अचंबित करणारे कारण…
मेडीकल जर्नल लैंसेंटमधील एका अभ्यासानुसार, जर एखाद्या मुलाचा जन्म जपानमध्ये झाला असेल तर, तो निरोगी व दीर्घायुषी ठरण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे साहजिकच प्रश्न निर्माण होतो जपानच्या या मातीत असे काय आहे, की लोक याठिकाणी सर्वाधिक निरोगी व दीर्घायुषी जीवन जगत असतात. त्यांच्या अशा कोणत्या सवयी त्यांना निरोगी ठेवतात, याची माहिती या लेखातून घेणार आहोत.
जगभरात जपानमधील लोकांचा मृत्यूदर हा सर्वाधिक कमी आहे. या ठिकाणी 90 ते 100 वर्ष लोक सहज जगत असतात. या देशात सर्वाधिक लोक दीर्घायुषी असतात. त्याच प्रमाणे जपानमधील मुल (japanese children) हे जगात सर्वात सुदृढ व निरोगी (healthiest) असल्याचेही म्हटले जात असते. जगभरातील लोकांच्या आरोग्याबाबत मेडीकल जर्नल लैसेंटमध्ये एक अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार, जपानमधील मुल ही सर्वाधिक निरोगी व दीर्घायुषी ठरत असल्याचे त्यात म्हटले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची जीवनशैली, (Lifestyle) त्यानंतर खाण्याच्या सवयी. जगभरात अगदी लहान वयातील मुलांमधील लठ्ठपणा व मधुमेहाच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. परंतु त्या तुलनेत जपानमध्ये या समस्या अगदी कमी आहेत. म्हणून जपानमधील मुलांच्या निरोगीपणाचे रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक संशोधकांनी प्रयत्न केला आहे.
- 1) जपानमधील मुलांच्या निरोगीपणाचे प्रमुख कारण त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये आहे. संशोधकांच्या मते, मुलांचे निरोगी राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना शाळेत जाताना दिले जाणारा आहार आहे. त्याचे काटेकोरपणे पालन केले जात असते. मुलांना दुपारच्या जेवणाशिवाय शाळेत पाठवले जात नाही. जेवणात सहज पचेल अशा घटकांचा समावेश केला जात असतो. शिवाय कमी कॅलरीज व जास्तीत जास्त जीवनसत्व असलेल्या अन्नघटकांना प्राधान्य दिले जाते.
- 2) मुलांना दुपारच्या जेवणात बेक केलेले मासे, स्वीट कोर्न, सूप आणि दुधासोबत कमी फॅट असलेले पदार्थ दिले जात असतात. त्यामुळे असे पदार्थ मुलांना पचण्यास सोपे जात असतात. त्याच प्रमाणे जेवणात तळण्यापेक्षा उकडलेल्या पदार्थांचा सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे रोजच्या जेवणात तेलाचा आणि मसाल्यांचा कमी वापर केला जात असतो. या जेवणामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते व जास्तीत जास्त जीवनावश्यक घटक शरीराला मिळत असतात. या शिवाय सिझनेबल फळ, भाज्या आदींचा वापर केला जातो.
- 3) ‘बिझनेस इनसाइडर’च्या एका रिपोर्टनुसार जपानी मुलांच्या जेवणात पिझ्झा किंवा पास्ताच्या एवजी तांदळापासून बनलेल्या पदार्थांचा सर्वाधिक समावेश असतो. खासकरुन शरीरासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या ब्राउन राईसचा वापर मुलांसाठी केला जात असतो. जपानच्या काझी सकुरा नर्सरी स्कूलच्या आहार तज्ज्ञ तोमोमी तकाशासी सांगतात, की मुलांच्या आहाराबाबत पालकांना सल्ला देताना मी मुलांना नेहमी तणावमुक्त ठेवण्याचे सांगते. मुलांनी त्यांचे जेवण आनंदाने केले पाहिजे या पध्दतीने त्यांच्याशी पालकांची वागणूक असायला हवी, असे त्या सांगतात.
- 4) तकाशासी सांगतात, जपानमध्ये कुणीही कितीही कामात व्यस्त असले तरी दिवसातून एकदातरी संपूर्ण कुटुंब सोबत जेवणासाठी एकत्र येते. प्रामुख्याने मुलांसोबत एकत्र बसून जेवण केले पाहिजे. यामुळे कुटुंबाला पाहून मुलांमध्येही जेवणाबद्दल गोडी निर्माण होत असते. शिवाय जेवणाबाबत त्यांना चांगल्या सवयी लागण्यास मदत होत असते.
- 5) जपानी मुलांच्या निरोगी जीवनाची मेख केवळ जेवणाच्या सवयीच नाही तर त्यांचे दिवसभरातील क्रियाकलापदेखील आहेत. एका संशोधनानुसार जपानमधील 98.3 टक्के मुलं एकतर पायी शाळेत जातात किंवा सायकल चालवत शाळेपर्यंत पोहचतात. त्यामुळे यातून लठ्ठपणाची समस्या दूर होते. शाळेदेखील शारीरिक खेळांकडे अधिक लक्ष दिले जाते.
संबंधित बातम्या :
Weight Loss : रोज व्यायाम करूनही वजन कमी होत नाहीये? मग या खास टिप्स फाॅलो करा! Weight Loss Tips : पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ रसांचा आहारात समावेश करा!