न्यूयॉर्क : प्रेम ही अशी गोष्ट आहे की, तिला जातीचं बंधन नाही. धर्माची आडकाठी नाही. वयाचं बंधन नाही आणि काळाचा लगाम नाही. प्रेम कुणावरही आणि कधीही होऊ शकतं. एवढंच कशाला आधी जिच्याशी ब्रेकअप झालं किंवा काही कारणास्तव जिच्याशी लग्न होऊ शकलं नाही, तिच्यावर पुन्हा प्रेम होऊ शकतं. शेवटी प्रेम हे प्रेमचं असतं आणि ते आंधळं असतं हे खरंच. एका प्रेमीयुगलांच्या बाबतीतही असंच झालं. कुटुंबाच्या विरोधामुळे दोघे लग्न करू शकले नाही. पुढे दोघांनी वेगवेगळ्या शहरात संसार थाटले. आपआपल्या संसारात रममाण झाले. पण 60 वर्षानंतर दोघे अचानक पुन्हा भेटले अन् पुन्हा प्रेमाला बहर आला आणि सहा दशकानंतर दोघांनी थेट लग्नच केलं.
79 वर्षीय लेन ऑलब्रायटन आणि 78 वर्षाची जेनेट स्टिअर पहिल्यांदा 1963 मध्ये भेटले होते. दोघेही त्यावेळी इंग्लंडच्या एका रुग्णालयात नर्सिंगची ट्रेनिंग घेत होते. दोघेही पहिल्याच भेटीत प्रेमात पडले होते. त्यानंतर काही महिन्याने लेनने जेनेटला लग्नाची मागणी घातली. परंतु, जेनेटचे आईवडील लग्नाला राजी नव्हते. त्यावेळी लग्नाचं वय 21 होतं. पण जेनेटचं वय लहान होतं. त्यामुळे घरच्यांचा लग्नाला विरोध होता. साखरपुडा झाला होता. पण लग्न वयात आल्यावरच करायचं असं जेनेटच्या कुटुंबीयांचं म्हणणं होतं. दुसरीकडे लेन लग्नाची तयारी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. त्यांनी तिथे गेल्यावर जेनेट आणि त्यांच्यासाठी जमीन खरेदी केली. त्यावर एक टुमदार घर बांधलं. पण अल्पवयीन वयात लग्न नको म्हणून जेनेटच्या कुटुंबीयांनी तिला लेन सोबत पाठवलं नाही. त्यामुळे लेन यांनी जेनेटसोबतचा विवाह मोडला.
लेनने नंतर ऑस्ट्रेलियात एका महिलेशी लग्न केलं. दुसरीकडे जेनेटनेही एका व्यक्तीसोबत लग्न केलं. परंतु 52 वर्षानंतर लेनने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. पुन्हा आपलं प्रेम मिळवण्यासाठी लेन इंग्लंडला परत आले. तिथे त्यांनी डायरेक्टरीतून जेनेटच्या घरचा पत्ता शोधला. त्यांना फार आशा नव्हती. पण तरीही ते जेनेटच्या घरी गेले. घरी गेल्यावर पहिल्यांदा जेनेटने लेनला ओळखलंच नाही. तेव्हा ती आपल्या पतीसोबत होती. तिने लेन यांना परत पाठवलं. कोणीतरी अनोळकी इसम आहे. तो मला पत्ता विचारण्यासाठी आला होता, असं तिने पतीला सांगितलं.
ही कहाणी इथेच थांबली नाही. या घटनेच्या दोन वर्षानंतर जेनेटच्या पतीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. त्यानंतर ती लेनकडे गेली. एक वर्षापूर्वीच लेन यांनी जेनेटला नाताळचं कार्ड पाठवलं होतं. त्यामुळे जेनेटने त्यांच्याशी संपर्क साधला. लेनने तिला सोबत राहण्यासाठी इंग्लंडला बोलावलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जेनेटला प्रपोज केलं. नंतर दोघांनी लग्नही केलं. त्यावेळी लेन अत्यंत भावूक झाला होता. आम्ही दोघे दुसऱ्यांदा प्रेमात पडलो. आम्ही एक दुसऱ्यांच्या कविता ऐकतो. त्यावेळी मी भावूक होतो, असं लेन म्हणाले. तर मॅरिड लाईफ मस्त आहे, असं जेनेट म्हणाली.