चीनमध्ये वुहानची पुनरावृत्ती, एका प्रांतातील ९० टक्के लोक कोरोना बाधीत
चीनच्या सर्वाधिक लोकसंख्येबाबत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हेनान प्रांतातील (हेनान) 90% लोक कोरोना संसर्गाला बळी पडले आहेत. हेनानच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
बिजिंग : झिरो कोविड धोरण मागे घेताच चीनमध्ये कोरोनाने थैमान (Corona Virus in China) सुरु केले आहे. चीनमधील या नवीन लाटेमुळे मोठे संकट निर्माण झालंय. चीनमधील शहर कोरोना संसर्गाच्या विळख्यात येत आहेत.आता चीनच्या सर्वाधिक लोकसंख्येबाबत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हेनान प्रांतातील (हेनान) 90% लोक कोरोना संसर्गाला बळी पडले आहेत. हेनानच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. यापूर्वी, कोरोनाच्या पहिल्या लाटेत चीनच्या वुहान प्रांतात अशाच प्रकारे कोरोनाने कहर केला होता. जगात कोरोनाचा पहिला रुग्ण वुहानमधूनच आढळून आला होता.हेनान प्रांताच्या आरोग्य आयोगाचे संचालक कान क्वानचेंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 6 जानेवारी 2023 पर्यंत हेनानमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण 89.0 टक्के होते. म्हणजेच, हेनानमधील 99.4 दशलक्ष लोकसंख्येपैकी (9.94 कोटी) 88.5 दशलक्ष म्हणजेच (8.84 कोटी) लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली होती.
चीनकडून लपवले जातात आकडे
कोरोना महामारीसारख्या परिस्थितीत डेटा लपवणे अधिक धोकादायक आहे. परंतु चीन आपले कारस्थान करतच आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने चीनला बजावले. डब्ल्यूएचओचे आपत्कालीन प्रमुख डॉ. मायकेल रायन म्हणाले होते की, चीनमध्ये कोरोनाचे कमी प्रकरणे समोर येत आहेत, परंतु तेथील रुग्णालयांमध्ये आयसीयू भरलेले आहेत.यावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले की, चीनमधील सध्याच्या परिस्थितीची आकडेवारी जगासोबत शेअर केली पाहिजे.
चीनमध्ये कोविड मृत्यूचे नियम बदलले जगभर असा नियम आहे की जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि त्याचा मृत्यू झाला तर तो कोविडमुळे झालेला मृत्यू मानला जाईल, पण चीनमध्ये याच्या अगदी उलट आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने अलीकडेच कोविड मृत्यूबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार, कोविड मृत्यूचा विचार तेव्हाच केला जाईल जेव्हा रुग्णाचा श्वसनाच्या आजाराने मृत्यू होतो. या मार्गदर्शक तत्त्वात असे म्हटले आहे की जर एखादा रुग्ण मधुमेह, कर्करोग, हृदय किंवा मेंदूशी संबंधित कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल आणि कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर त्याला कोविड मृत्यू मानले जाणार नाही.