बांगलादेशात आगडोंब उसळला, मृत्यूचं तांडव, आतापर्यंत 93 ठार; संपूर्ण देशात कर्फ्यू
बांगलादेश पुन्हा एकदा होरपळून निघाला आहे. सरकारी नोकरीत आरक्षण ठेवू नये या मागणीसाठी बांगलादेशातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यार्थ्यांनी वाहने पेटवली आहेत. रस्ते ब्लॉक केले आहेत. सरकारी मालमत्तांचं नुकसान केलं आहे. त्याशिवाय पोलिसांना मारहाणही केली आहे. त्यामुळे बांगलादेशातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू जारी करण्यात आला आहे.
बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसा भडकली आहे. रविवारी दिवसभर बांगलादेशात जाळपोळ सुरू होती. या हिंसेत आज दिवसभरात 93 नागरिक ठार झाले आहेत. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. बांगलादेशातील विद्यार्थी आणि विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना प्रचंड चोप दिला आहे. बांगलादेशात प्रचंड जाळपोळ करण्यात येत आहे. वाहने फोडली जात आहेत. सरकारी मालमत्तांचं नुकसान केलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशातच कर्फ्यू लावण्यात आला आहे.
हजारो विद्यार्थ्यांनी आज रस्त्यावर उतरून पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यासाठी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. त्यामुळे या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी स्टन ग्रेनेडचाही वापर केला आहे. हिंसा अधिकच भडकल्याने आज संध्याकाळी 6 वाजता देशात अनिश्चितकालीन राष्ट्रव्यापी कर्फ्यू लावण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरापासून देश धुमसत असल्याने अखेर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आरक्षणाला विरोध
सरकारी नोकऱ्यांमधून आरक्षण रद्द करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून येथील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. या आंदोलनात आतापर्यंत देशभरात कमीत कमी 200 लोकांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेशाची राजधानी ढाका येथून या आंदोलनाला सुरुवात झाली असून त्याचं लोण देशभरात पसरलं आहे.
सकाळपासूनच विद्यार्थी रस्त्यावर
आज सकाळपासूनच विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विशेष म्हणजे हे विद्यार्थी हातात लाठ्याकाठ्या घेऊनच रस्त्यावर उतरले होते. ढाका येथील शाहबाग चौकात जमाव जमल्याने यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्याशिवाय देशभरात ठिकठिकाणी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आल्याने संघर्ष निर्माण झाला. आंदोलकांनी देशातील महत्त्वाचे हायवे बंद केले आहेत. सत्ताधारी अवामी लीगचे समर्थकही या रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी आंदोलक यांच्यात जोरदार हाणामारी झाली.
गेल्याच महिन्यात हिंसा
दरम्यान, गेल्याच महिन्यात म्हणजे जुलैमध्ये सुद्धा बांगलादेशात हिंसा भडकली होती. त्यावेळीही वाहने पेटवून देण्यात आली होती. जाळपोळ करण्यात आली होती. बांगलादेशातील ढाका हे शहर युद्धाचं मैदान बनलं होतं. आजही तीच परिस्थिती असल्याचं पोलिसांनी सांगितलं. गेल्या महिन्यात बोगुरा, मगुरा, रंगापूर आणि सिराजगंजसह 11 जिल्ह्यात अनेकांचा मृत्यू झाला होता.