अंकारामध्ये ’26/11’सारखा दहशतवादी हल्ला! 10 ठार, पोलिसांनी दहशतवाद्यांना घेरलं
तुर्कीमधील अंकारा येथील एव्हिएशन कंपनी तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीज (TUSAS) च्या मुख्यालयाबाहेर बुधवारी मोठा स्फोट झाला. त्यानंतरही तेथे उपस्थित असलेले दोन दहशतवादी सतत हल्ले करत आहेत.
तुर्कीची राजधानी अंकारा येथील एव्हिएशन कंपनी तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीज (TUSAS) च्या मुख्यालयाबाहेर मोठा दहशतवादी हल्ला झालाय. दोन दहशतवाद्यांकडून येथे बेछुट गोळीबार सुरु आहे. येथे झालेल्या एका स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक तपासात हा आत्मघातकी बॉम्बस्फोट हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्कियाचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.
तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक निवेदन जारी केले, ज्यात त्यांनी लिहिले की, “तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीजवर दहशतवादी हल्ला झालाय. दुर्दैवाने आमचे जवान शहीद झाले असून अनेक लोकं जखमी झाले आहेत.
हल्ल्याच्या वेळी परिसरात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले असून सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तुर्की अधिकाऱ्यांनी याला दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट केले आहे.