ISIS मध्ये सामिल 25 भारतीय अफगाणिस्तानात, भारतात पाठवण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता?
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आलं असलं तरी तेथे दुसरी एक दहशतवादी संघटनाही अस्तित्वात आहे जिने नुकतीच अमेरिकेचीही डोकेदुखी वाढवली होती. ही संघटना म्हणजे इसिस (ISIS). अफगाणिस्तानमधील गट स्वतःला इसिस-के असं म्हणतोय. यात भारताचे 25 नागरिक सहभागी असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलाय.
काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आलं असलं तरी तेथे दुसरी एक दहशतवादी संघटनाही अस्तित्वात आहे जिने नुकतीच अमेरिकेचीही डोकेदुखी वाढवली होती. ही संघटना म्हणजे इसिस (ISIS). अफगाणिस्तानमधील गट स्वतःला इसिस-के असं म्हणतोय. यात भारताचे 25 नागरिक सहभागी असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलाय. भारतीय गुप्तचर यंत्रणेला याबाबत माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे इसिसमधील या भारतीय नागरिकांना भारतात पाठवण्याचेही प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे.
भारतीय नागरिक असलेले इसिसचे हे 25 सदस्य अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतात असण्याची शक्यता आहे. नुकतेच अफगाण तुरुंगातून सोडण्यात आलेल्या कैद्यांमध्ये इसिस-के च्या अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे, अशीही माहिती भारतीय गुप्तचर संस्थेला मिळालीय. यातीलच 25 जण काही वर्षांपूर्वीच इसिसमध्ये सहभागी झालेले भारतीय नागरिक आहेत. हे सर्व लोक तुरुंगात बंद होते, मात्र नुकतेच त्यांना सोडून देण्यात आले आहे. इसिस या सर्व लोकांचा उपयोग भारताविरोधात करण्याची शक्यताही आहे. या सर्वांना इसिसने पाकिस्तान-अफगाणिस्तान बॉर्डरवर कॉम्बॅट ट्रेनिंग देखील दिलंय.
सोशल मीडियावरुन जाळ्यात अडकवलं, नंतर इसिसमध्ये भरती
इसिसमधील या सर्वांना मुंसिब नावाच्या एका ISIS दहशतवाद्यानं भरती केलं होतं. तो इसिसच्या सोशल मीडियावर रिक्रूटमेंट सेलचं काम पाहतो. मुंसिब एक आयटी एक्सपर्ट आहे. तो पाकिस्तानचा रहिवासी आहे. त्यानेच या तरुणांना शिक्षणाच्या निमित्ताने जाळ्यात अडकवलं आणि नंतर हळूहळू इसिसमध्ये सहभागी करुन घेतलं. ISIS आता या लोकांना भारतात घुसवण्याच्या प्रयत्नात आहे.
इसिसचा अफगाणमध्ये धुमाकूळ, काबुल विमानतळावर 2 हल्ले
दरम्यान, इसिसने अफगाणमध्ये धुमाकूळ घातलाय. इसिसने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 169 अफगाण नागरिक आणि 13 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला. त्यानंतही इसिसने पुन्हा काबुल विमानतळावर हल्ला केला. यानंतर अमेरिकेने ड्रोन हल्ले करत विमानतळावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा खात्मा केला. तसेच इतर ठिकाणी देखील अमेरिकन सैन्याने कारवाई केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून आयसिसने 30 ऑगस्टला पुन्हा 5 रॉकेट डागत हल्ला केला.
विमानतळावरील हल्ल्यांमागे आयसिस की तालिबानच?
विशेष म्हणजे तालिबान्यांनी अफगाण सैन्याच्या ताब्यातून काबुलसह अफगाणिस्तानमधील मोठ्या भागावर आपलं नियंत्रण प्रस्थापित केलंय. या भागावर संपूर्णपणे तालिबानचं नियंत्रण निर्माण झालंय. मग त्यांच्या उपस्थितीत काबुल विमानतळावर कोण हल्ला करत आहे असाही प्रश्न विचारला जातोय. तालिबानच्या सहमतीशिवाय असे हल्ले होऊ शकतात का? असाही प्रश्न आहे. यातूनच या हल्ल्यांमागे अचानक चर्चेत आलेली आयसिस-के संघटना आहे की तालिबान यामागून काही सूत्रं हालवतोय की अन्य कुणी यामागे आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे याच्या सूत्रधारांचं नाव आगामी काळातच स्पष्ट होऊ शकणार आहे.
हेही वाचा :
Video : अमेरिकेला मदत करणाऱ्याला हेलिकॉप्टरला टांगून हत्या, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
बुशपासून बायडनपर्यंत 4 राष्ट्राध्यक्ष बदलले, ट्रिलियन डॉलर खर्च, अमेरिकेला काय मिळालं? 20 वर्षांच्या अफगाण युद्धावर एक नजर
अमेरिकेची कमाल, काबूल एअरपोर्टरवर डागलेली 5 रॉकेट्स जिथल्या तिथे निकामी!
व्हिडीओ पाहा :
From Afghanistan 25 Indians links with ISIS may tray to infiltrate in India