तालिबान सरकारमध्ये फूट, नाराज मुल्ला अब्दुल गनी बरादर कित्येक दिवसांपासून गायब
तालिबानच्या अंतरिम सरकारमध्ये ( Taliban interim government ) फूट पडली आहे. तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला गनी बरादरचा ( Mullah Gani Baradar ) गट आणि मंत्रिमंडळाच्या एका सदस्याचा वाद झाला. त्यानंतर मुल्ला गनी बरादर हा चांगलाच नाराज असल्याचं कळतं आहे.
काबुल: तालिबानच्या अंतरिम सरकारमध्ये ( Taliban interim government ) फूट पडली आहे. तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला गनी बरादरचा ( Mullah Gani Baradar ) गट आणि मंत्रिमंडळाच्या एका सदस्याचा वाद झाला. त्यानंतर मुल्ला गनी बरादर हा चांगलाच नाराज असल्याचं कळतं आहे. बीबीसीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. गेल्या काही दिवसांत मुल्ला गनी बरादर हा सार्वजनिक कार्यक्रमात वा इतरही ठिकाणी दिसलेला नाही. त्यामुळेच मुल्ला बरादर हा नाराज असून त्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता दाट आहे. मात्र, असं असलं तरी तालिबानकडून या शक्यता नाकारण्यात आल्या आहेत. ( Taliban interim government likely to split, disgruntled Mullah Gani Baradar leaves Kabul and moves to Kandahar )
तालिबानमध्ये वाद कसा झाला?
15 ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. त्यानंतर आधी जे अमेरिकेच्या हिटलिस्टवर दहशतवादी होते, त्याच तालिबान्यांना मंत्रिमंडळात सर्वोच्च पदं देण्यात आली. याच दरम्यान, मुल्ला बरादर आणि उर-रहमान या दोघांमध्ये वादावादी झाली. या वादावादीनंतर दोघांचेही समर्थक आपापसात भिडले. खलील उर-रहमान हा दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कचा नेता आहे, ज्याला तालिबान सरकारमध्ये निर्वासितांचा मंत्री बनवण्यात आलं आहे.
बरादर आणि रहमान यांच्यातील वादाचं कारण काय?
मुल्ला बरादर हा तालिबानच्या अंतरिम सरकारमध्ये उप-पंतप्रधान आहे. बरादर हा मंत्रिमंडळाच्या संरचनेवरुन नाराज होता. त्यातच अफगाणिस्तानात ताबा मिळवण्यात सर्वात मोठा हात कुणाचा, यावरुन तालिबानमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. बरादरला वाटतं की त्याने केलेल्या डिप्लोमसीमुळेच तालिबान अफगाणिस्तानवर सत्तेत आला, तर दुसरीकडे हक्कानी नेटवर्कच्या लोकांना वाटतं की, तालिबानला अफगाणिस्तानात सत्तेत त्यांनीच आणलं.
बरादर आणि हक्कानी नेटवर्कचं स्थान काय?
एकीकडे बरादर तालिबानचा तो नेता आहे, ज्याने 2020 मध्ये अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर दोहा करारावेळीही बरादर यानेच अमेरिकी सैन्याला परत पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तो मंजुरही करुन घेतला. तर दुसरीकडे हक्कानी नेटवर्क ही अफगाणिस्तानातील सर्वात शक्तीशाली दहशतवादी संघटना बनली आहे. यांनीच अफगाणिस्तानात आतापर्यंत अनेक भ्याड हल्ले केले आणि लोकांना मारलं. अफगाणिस्तानातील भारतीय परराष्ट्र मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात यांचाच हात आहे. अमेरिकेने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. तर या संघटनेचा संस्थापक सिराजुद्दीन हक्कानी हा अमेरिकेसह संयुक्त राष्ट्रांच्या दहशतावाद्यांच्या यादीत आहे. ज्या सिराजुद्दीन हक्कानीला तालिबानच्या आताच्या सरकारमध्ये गृहमंत्री बनवण्यात आलं आहे.
मुल्ला बरादर सध्या कुठे आहे?
मुल्ला बरादर सध्या काबूलमध्ये नसल्याचं कळतं आहे. हक्कानी नेटवर्कसोबतच्या वादानंतर बरादरने काबूल सोडलं आणि तो कंदहारला चालला गेल्याची माहिती आहे. बरादर गायब झाल्यानंतर चर्चा सुरु झाल्या होत्या, त्यामुळेच शेवटी तालिबानने एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली, ज्यात बरादर सांगतो आहे, की तो यात्रेसाठी बाहेर आला आहे. तो एकदम व्यवस्थित आहे. तालिबानच्या म्हणण्यानुसार, सरकारमध्ये कुठलाही वाद नाही आणि मुल्ला बरादर एकदम सुरक्षित आहेत.
संबंधित बातम्या:
‘तालिबानी राज’वर ईराण नाराज? म्हणाला, ‘तालिबानी सरकारमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधीच नाहीत’
अफगाणी महिलांचा एल्गार, #DoNotTouchMyClothes, #AfghanistanCulture हॅशटॅगखाली रंगीबेरंगी कपड्यांतील फोटो पोस्ट