Israel Lebanon War : अखेर लेबनानमध्ये घुसलं इस्रायली सैन्य
Israel Lebanon War : गाजा पट्टीत हमास विरोधात निर्णायक कारवाई केल्यानंतर इस्रायलने आता लेबनान विरुद्ध ऑपरेशन सुरु केलं आहे. काही दिवसांपूर्वी युद्धाचा आता दुसरा टप्पा सुरु झालाय, असं इस्रायलच्या अधिकाऱ्याने म्हटलं होतं. त्यानुसार इस्रायलने आता दुसऱ्या युद्धाची सुरुवात केली आहे. मागच्या आठवड्यापासून इस्रायलकडून लेबनानमध्ये एअर स्ट्राइक सुरु होते.
हिज्बुल्लाहच्या तळावर हवाई हल्ले आणि हसन नसरल्लाहचा खात्मा केल्यानंतर इस्रायली सैन्य लेबनानमध्ये घुसलं आहे. इस्रायलने लेबनानच्या आत जमिनी हल्ले सुरु केले आहेत. दक्षिण लेबनानमध्ये हिज्बुल्लाहचे तळ आणि इन्फ्रास्ट्रक्चर विरोधात मर्यादीत आणि टार्गेटेड जमिनी हल्ले सुरु केले आहेत, असं इस्रायली सैन्याने सांगितलं. इस्रायली सैन्यानुसार, हे हल्ले अचूक गोपनीय माहितीच्या आधारावर केले जात आहेत. लेबनानमध्ये इस्रायलने सुरु केलेल्या या ग्राऊंड ऑपरेशनवर अमेरिकेने सुद्धा भाष्य केलं आहे. IDF ने लेबनानमध्ये हिज्बुल्लाहच्या इन्फ्रास्ट्रक्चर विरोधात कारवाई सुरु केली आहे. मर्यादीत स्वरुपाची ही Action असेल. इस्रायलने याची आम्हाला माहिती दिली आहे, असं अमेरिकेने सांगितलं.
इस्रायली सीमेला लागून असलेल्या लेबनानच्या सीमा भागात हिज्बुल्लाहने जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलय त्यावर हल्ले सुरु आहेत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी ही माहिती दिली. याच इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करुन उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरु होते. म्हणून इस्रायलने आता हे तळ उखडून टाकण्याच ऑपरेशन सुरु केलं आहे. याआधी 2006 साली इस्रायली सैन्य लेबनानमध्ये घुसलं होतं. 12 जुलै 2006 रोजी हिज्बुल्लाहने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. हिज्बुल्लाहच्या दहशतवाद्यांनी इस्रायली सीमेमध्ये घुसून तीन सैनिकांची हत्या केली होती. दोघांना बंधक बनवलं होतं.
34 दिवस चाललेलं युद्ध
इस्रायलने तत्कालीन पंतप्रधान एहुद ओलमर्ट यांनी यासाठी लेबनानला जबाबदार ठरवत ‘एक्ट ऑफ वॉर’ म्हटलेलं. लेबनानला याची किंमत चुकवावी लागेल असं ते म्हणाले होते. त्याच रात्री इस्रायली सैन्याने लेबनावर हल्ला केला होता. इस्रायली सैन्याने ग्राऊंड ऑपरेशनसह हवाई हल्ले केले होते. एका हवाई हल्ल्यात बेरुत इंटरनॅशनल एअरपोर्टचा रनवे सुद्धा नष्ट केला होता. 34 दिवस चाललेल्या इस्रायल-हिज्बुल्लाह युद्धात 1100 पेक्षा जास्त लेबनानी नागरिकांचा मृत्यू झाला होता. इस्रायलच्या 165 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
In accordance with the decision of the political echelon, a few hours ago, the IDF began limited, localized, and targeted ground raids based on precise intelligence against Hezbollah terrorist targets and infrastructure in southern Lebanon. These targets are located in villages…
— Israel Defense Forces (@IDF) September 30, 2024
हिज्बुल्लाहची निम्मी सैन्य शक्ती संपली
इस्रायली सैन्य दक्षिण लेबनानमध्ये घुसलं आहे. तिथे सीमेजवळ हिज्बुल्लाहने बांधलेल्या सुरुंगांमध्ये शोध मोहिम सुरु आहे. शुक्रवारी इस्रायलच्या एअर स्ट्राइकमध्ये हिज्बुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला. इस्रायलने हिज्बुल्लाहच कबंरड मोडताना त्यांची निम्मी सैन्य शक्ती संपवून टाकली आहे.