मालदीवनंतर आणखी एका देशात भारत विरोधी सरकार, चीनची चाल झाली यशस्वी
मालदीवसोबत भारताचे संबंध बिघडले असतानाच भारतासाठी आणखी एक बॅडन्यूज आली आहे, कारण भारत विरोधी मानले जाणारे पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. भारतापासून इतर देशांना दूर करण्यासाठी चीनची चाल सुरु आहे. भारत देखील आपल्या शेजारीला देशांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.
Nepal political Update : मालदीवनंतर भारताच्या आणखी एका शेजारी देशात भारत विरोधी नेता सत्तेत आला आहे. आम्ही बोलत आहेत नेपाळबद्दल जेथे सत्ता परिवर्तन झाले आहे. नेपाळमधील राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी आज माजी पंतप्रधान केपी ओली यांच्यासोबत हातमिळवणी केली असून नवीन सरकार सत्तेत येणार आहे. प्रचंड आणि माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांचा पक्ष नेपाळी काँग्रेस यांच्यातील 15 महिने जुनी युती तुटली आहे. या सत्तापरिवर्तनात चीनच्या राजदूताच्या भूमिकेचीही चर्चा आहे. नेपाळमध्ये आपले वर्चस्व वाढावे म्हणून चीनकडून प्रयत्न सुरु होते. चीनने अनेकवेळा डाव्या पक्षाला पाठिंबा दिला होता. देउबा हे भारत समर्थक मानले जात होते आणि त्यांनी ते सत्तेत आल्यापासून त्याचे भारतासोबतचे संबंध सामान्य झाले होते.
देउबा यांच्याआधी नेपाळचे पंतप्रधान असलेले केपी शर्मा ओली हे चीन समर्थक मानले जातात. ओली हे पंतप्रधान असताना त्यांनी अनेकवेळा भारतविरोधी भूमिका घेतली होती. चीनच्या सांगण्यावरून ओली यांनी नेपाळचा नवा नकाशा जारी केला होता ज्यात त्यांनी भारतातील लिंपियाधुरा आणि कालापानी हे नेपाळचा भाग असल्याचे त्यांनी घोषित केले होते. चीनचे नवे राजदूत नेपाळमध्ये आल्यापासून त्यांनी प्रचंड आणि ओली यांची अनेकदा भेट घेतली होती. त्यामुळे या सत्तापरिवर्तनामध्ये चीनचा हात असल्याची चर्चा आहे. प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ आणि शेर बहादूर देउबा यांच्या नेतृत्वाखालील नेपाळी काँग्रेस यांच्यातील युती आता संपुष्टात आली आहे कारण दोन प्रमुख नेत्यांमधील मतभेदे वाढले होते.
सीपीएन-माओवादीचे सचिव गणेश शाह काय म्हणाले
नेपाळी काँग्रेसने पंतप्रधान प्रचंड यांना सहकार्य न केल्यामुळे आम्हाला नवीन पक्षासोबत युती करावी लागल्याचं गणेश शाह यांनी म्हटले आहे. 25 डिसेंबर 2022 रोजी प्रचंड नेपाळी काँग्रेसच्या पाठिंब्याने तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते. नेपाळी काँग्रेससोबतची युती तोडल्यानंतर प्रचंड यांनी ओली यांच्या नेतृत्वाखालील नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टी सीपीएन-यूएमएलशी हातमिळवणी केली, जे आतापर्यंत प्रचंड यांचे सर्वोच्च टीकाकार मानले जात होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी प्रमुख विरोधी नेपाळी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावरून झालेल्या मतभेदानंतर ओली यांच्या पक्षाने गेल्या वर्षी प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला होता.
प्रचंड भारताशी चांगले संबंध ठेवू शकतात
गणेश शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष ओली यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पंतप्रधान प्रचंड यांची भेट घेतली आणि नवीन युती स्थापन करण्यासंदर्भात चर्चा केली. विश्लेषकांच्या मते, ओली परतत असले तरी प्रचंड हे भारतासोबतच्या संबंधात संतुलन राखू शकतात. प्रचंड यांनी आपल्या कार्यकाळात भारताशी संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे. मात्र, ओली पुन्हा एकदा सीमावादाचा मुद्दा उपस्थित करू शकतात.