Titan Submersible Update : टायटॅनिकचा ढिगारा पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा अखेर शोध लागला, समुद्रात मोठी दुर्घटना
Titan Submersible Update : अमेरिकन कोस्ट गार्डकडून महत्वाची माहिती. उत्तर अटलाटिंक महासागरात रविवारी ही मोहिम सुरु झाली होती. अवघ्या दीड तासात या पाणबुडीचा मुख्य जहाजाशी असलेला संपर्क तुटला होता.
न्यूयॉर्क : मागच्या चार दिवसांपासून शोध सुरु असलेल्या टायटन पाणबुडीचा अखेर शोध लागला आहे. या पाणबुडीमध्ये पाच पर्यटक होते. महाकाय टायटॅनिक जहाजाला 1912 साली खोल समुद्रात जलसमाधी मिळाली. हे जहाज कधी बुडणार नाही, अशी ख्याती होती. याच बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी टायटन पाणबुडीतून हे पर्यटक गेले होते. उत्तर अटलाटिंक महासागरात रविवारी ही मोहिम सुरु झाली होती.
टायटन पाणबुडी समुद्राच्या आत गेल्यानंतर अवघ्या दीड तासात या पाणबुडीचा मुख्य जहाजाशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर या पाणबुडीच्या शोधासाठी अमेरिका आणि कॅनडा या देशांनी मोठी शोध मोहिम राबवली.
टायटॅनिकचा ढिगारा पाहण्याची मोहीम कधी सुरु झालेली?
अखेर गुरुवारी या पाणबुडीबद्दल माहिती मिळाली. दुर्देवाने या पाणबुडीतील सर्वच्या सर्व पाचही पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पाणबुडीचे संचालन करणाऱ्या OceanGate कंपनीने या बद्दल माहिती दिली. 18 जून रोजी OceanGate कंपनीची ही पाणबुडी खोल समुद्रात उतरली होती.
कोणी शोधून काढलं?
रॉयटर्स या न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, टायटॅनिक जहाजाच्या ढिगाऱ्याजवळ या बेपत्ता पाणबुडीचा ढिगारा आढळून आलाय. अमेरिकन कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार, पाणबुडीचा ढिगारा मिळाल्यानंतर तज्ञ्ज्ञांच्या टीमने त्यावर काम सुरु केलं. कॅनडाच एक जहाज या शोध मोहिमेत सहभागी झालं होतं. याच जहाजाच्या मानवरहीत रोबोटने टायटन पाणबुडीचा ढिगारा शोधून काढला.
या पाणबुडीत एक पाकिस्तानी अब्जाधीश
टायटन पाणबुडीतील पाचही पर्यटक अब्जाधीश होते. OceanGate सीईओ स्टॉकटन रश, पाकिस्तीन उद्योगपती शहजादा दाऊद, त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, ब्रिटिश उद्योजक हामिश हार्डिंग आणि पॉल हेनरी या पाचही जणांचा मृत्यू झालाय. या पाणबुडीत 90 तासापेक्षा जास्त पुरेल इतका ऑक्सिजन साठा होता. त्यामुळे पाणबुडी भरकटलीय असा सुरुवातीला अंदाज बांधण्यात आला होता. त्या दिशेने तपास सुरु होता.
खोल समुद्रात काय घडलं?
काल ऑक्सिजन संपणार होता, त्यावेळी शोध मोहिमेला अजून वेग दिला. त्यावेळी पाणबुडीचा ढिगारा सापडला. महासागरात उतरल्यानंतर या टायटन पाणबुडीचा स्फोट झाला. 18 जूनला हा प्रवास सुरु झाला होता. टायटॅनिकच्या ढिगाऱ्यापर्यंत पोहोचून तिथे फिरुन परत येण्यासाठी आठ तास लागणार होते. म्हणजे त्याचदिवशी हे पाचही पर्यटक तळावर पोहोचणार होते. खोल समुद्रात टायटॅनिकचा ढिगारा दाखण्यासाठी OceanGate कंपनी प्रतिमाणशी 2.5 लाख डॉलर म्हणजे 2 कोटी रुपये आकारते. 2021 पासून त्यांचा हा व्यवसाय सुरु होता. “आमच्या कंपनीचे सीईओ स्टॉकटन रश, शहजादा दाऊद त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हामिश हार्डिंग आणि पॉल-हेनरी नार्जियोलेट यांना आपण गमावलय” असं OceanGate कंपनीने गुरुवारी जाहीर केलं.