Modi-Biden Talk : मोदी-बायडेन चर्चेत व्हाइट हाऊसने सोयीच तेवढं घेतलं, पण हिंदुंच्या विषयावर…
Modi-Biden Talk : सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये टेलिफोनवरुन चर्चा झाली. त्यासंबंधी आता व्हाइट हाऊसने जारी केलेल स्टेटमेंट धक्कादायक आहे. पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांच्यात काय चर्चा झाली? आणि व्हाइट हाऊसने त्यातलं काय घेतलं? हा महत्वाचा मुद्दा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये सोमवारी रात्री टेलिफोनवर चर्चा झाली. बांग्लादेशातील परिस्थितीबाबत विस्तृत बोलणं झालं. बांग्लादेशात अल्पसंख्यांक खासकरुन हिंदुंच्या सुरक्षेबद्दल चिंताजनक स्थिती आहे असं पंतप्रधान मोदी राष्ट्रपती बायडेन यांना म्हणाले. दोन्ही नेत्यांमध्ये जी चर्चा झाली, त्याबद्दल व्हाइट हाऊसकडून एक स्टेटमेंट जारी करण्यात आलय. त्यातून बांग्लादेश संबंधीचा मुद्दा गायब आहे. अमेरिकेच्या स्टेटमेंटमध्ये फक्त त्यांच्या सोयीचे मुद्दे आहेत. अमेरिकेच्या स्टेटमेंटमध्ये मोदींच्या युक्रेन दौऱ्याला स्थान देण्यात आलय. बांग्लादेशातील हिंदुंच्या स्थितीबद्दल पंतप्रधान मोदींनी केलेली चर्चा, भारताला वाटणाऱ्या चिंता यांना स्थान दिलेलं नाही.
बायडेन यांनी पोलंड आणि युक्रेनच्या ऐतिहासिक दौऱ्यासाठी भारतीय पंतप्रधानांच कौतुक केलं असं व्हाइट हाऊसने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. मागच्या काही वर्षातील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच युक्रेन दौरा होता. पंतप्रधान मोदींनी बायडेन यांच्यासोबत युक्रेन दौऱ्यातील अनुभव शेअर केले. भारताने आपली भूमिका स्पष्ट केली. रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा आणि कुटनितीक प्रयत्नांनी मार्ग काढता येईल असं मोदी म्हणाले.
मग, भारत-अमेरिका भागीदारीचा उद्देश काय?
युक्रेनच्या स्थितीवर चर्चा करताना पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती बायडेन यांना आपल्या युक्रेन दौऱ्यातील घडामोडींची माहिती दिली. चर्चा आणि कुटनितीच समर्थन केलं. शांतता आणि स्थिरतेसाठी भारत पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे असं पीएम मोदी म्हणाले. दोन्ही नेत्यांमध्ये बांग्लादेशच्या ताज्या स्थितीबद्दल चर्चा झाली. बांग्लादेशात शांतता प्रस्थापित करणं, अल्पसंख्यांक खासकरुन हिंदुंची सुरक्षा निश्चित करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. पीएम मोदी आणि बायडेन यांनी क्वाडसह बहुपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याच म्हटलं. मानवतेच हित साधणं हाच भारत-अमेरिका भागीदारीचा उद्देश आहे असं पीएम मोदी म्हणाले.
शेख हसीना यांनी काय दावा केलेला?
माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 5 ऑगस्टला बांग्लादेश सोडून पळावं लागलं. त्यावेळी बांग्लादेशात सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनामागे अमेरिका असल्याच म्हटलं गेलं. रणनितीक दृष्टीने महत्त्वाच सेंट मार्टिन आयलँड अमेरिकेला दिलं नाही, म्हणून सत्तेवरुन पायउतार व्हाव लागलं असा दावा शेख हसीना यांनी केला.
जाणूनबुजून दुर्लक्ष
बांग्लादेशातील अमेरिकेच्या हस्तक्षेपाबद्दल मागच्यावर्षी रशियाने तत्कालीन शेख हसीना सरकारला सावधही केलं होतं. बांग्लादेशात सत्ता परिवर्तनानंतर अमेरिकेच्या भूमिकेमुळे या संशयाला बळ मिळालय. 5 ऑगस्ट आणि त्यानंतर बांग्लादेशात हिंदुंविरोधात झालेला हिंसाचार याकडे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केलं.