America Warns India : अमेरिकेच्या धमकीला भीक न घालता भारताने स्वहितासाठी उचललं ठोस पाऊल
America Warns India : भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या दरम्यान भारताने एक मोठी डील केली आहे. या डीलनंतर लगेच अमेरिकेला मिर्च्या झोंबल्या आहेत. अमेरिकेने थेट इशारा दिलाय. भारताला अमेरिकेच्या भूमिकेची कल्पना आहे. पण आपल स्वहित डोळ्यासमोर ठेऊन भारताने निडर होऊन पाऊल उचललय.
भारताने नुकतीच इराणसोबत चाबहार बंदराची डील केली. या डीलनंतर लगेच अमेरिकेला मिर्च्या झोंबल्या आहेत. इराणच्या दक्षिण किनाऱ्यावरील सिस्तान-बलूचिस्तान प्रांतामध्ये चाबहार बंदर आहे. भारत-इराण मिळून हे बंदर विकसित करणार आहे. भारताने 10 वर्षांसाठी करार केला असून या माध्यमातून भारताला व्यापाराचे नवे मार्ग खुले होणार आहेत. मध्य आशियामध्ये व्यापार वाढवण्यासाठी भारताला मदत होणार आहे. भारताने इराण सोबत करार करताच अमेरिकेने धमकी दिली आहे. इराणसोबत व्यापारी डील करणाऱ्यांना निर्बंधांच्या धोक्याची कल्पना असली पाहिजे असं अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकेने इराणच्या मानवरहीत विमान उत्पादनाच्या बिझनेसमध्ये बाधा आणण्यासाठी त्यांच्यावर नवीन निर्बध लादले आहेत. इराणने इस्रायलवर हवाई हल्ला केल्यानंतर अमेरिकेने हे पाऊल उचललं होतं. आता त्यांनी इराणसोबत व्यापारी संबंध विस्तारणाऱ्या भारताला इशारा दिलाय.
“चाबहार बंदरासंदर्भात भारत आणि इराणने करार केल्याची आम्हाला कल्पना आहे. इराणसोबतचे द्विपक्षीय संबंध, चाबहार बंदर, फॉरेन पॉलिसी उद्दिष्टय त्या बद्दल भारत सरकारला बोलू दे” असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उप प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले. भारत-इराण करारासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं. भारतीय कंपन्यांवर सुद्धा निर्बंध घालणार का? या प्रश्नावर वेदांत पटेल म्हणाले की, “तुम्ही हे अनेकदा ऐकलय की, कुठलीही कंपनी इराण बरोबर बिझनेस डील करण्याचा विचार करत असेल, तर त्यांना संभाव्य निर्बंधांच्या धोक्याची कल्पना असली पाहिजे”
अमेरिकेने पाकिस्तान विरोधातही पाऊल उचललं
जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड (आयपीजीएल) आणि इराणच्या पोर्ट्स अँड मेरिटाइम ऑर्गेनायजेशनने या कॉन्ट्रॅक्टवर स्वाक्षरी केली. यावर्षी एप्रिल महिन्यात अमेरिकेने पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रॅमला सपोर्ट् करणाऱ्या पुरवठादारांवर निर्बंध लादले. यात तीन चिनी कंपन्या आहेत.
रशिया बरोबरच्या करारावेळीही भारताने नाही जुमानलं
याआधी भारताने रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतली. त्यावेळी सुद्धा अमेरिकेने निर्बंध घालण्याची धमकी दिली होती. पण भारताने त्यावेळी सुद्धा त्यांच्या इशाऱ्याला न जुमानता रशियाकडून ही मिसाइल सिस्टिम विकत घेतली. भारताने आता ही S-400 सिस्टिम पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमेवर तैनात केली आहे.